‘वायसीएम’ रुग्णालयात राखीव कोट्याची मागणी
By admin | Published: July 21, 2016 02:10 AM2016-07-21T02:10:12+5:302016-07-21T02:10:12+5:30
आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्यांतून अपघातांमुळे पिंपरी-चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना बेड व आयसीयू सहजासहजी उपलब्ध होत नाहीत.
घोडेगाव : आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्यांतून अपघातांमुळे पिंपरी-चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयात जाणाऱ्या रुग्णांना बेड व आयसीयू सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. यासाठी वशिला अथवा ओळख लागते. म्हणून या तीन तालुक्यांतील रुग्णांसाठी वायसीएममध्ये राखीव कोटा असावा, अशी मागणी महाराणा प्रताप संस्थेचे अध्यक्ष संतोष गावडे यांनी केली आहे.
अपघात, हृदयविकाराचा झटका, सर्पदंश अथवा इतर अचानक निर्माण होणाऱ्या गंभीर आजारांवर उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर वायसीएम रुग्णालयात घेऊन जाण्याची चिठ्ठी देतात. या तीन तालुक्यांना जवळचे व सरकारी रुग्णालय वायसीएम हेच आहे. अपघातामुळे भांबावलेले तसेच गोरगरीब व अडाणी लोक डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वायसीएममध्ये आणतात. मात्र येथे आल्यावर बेड उपलब्ध नाहीत, आयसीयूमध्ये जागा नाही, अशी कारणे सांगून पुढे ससून रुग्णालयात घेऊन जा अथवा खासगी दवाखान्यात न्या, असे सांगितले जाते.
ज्याची ओळख अथवा वशिला स्थानिक आमदार, माजी आमदार, नगरसेवक यांच्याशी असल्यास त्या पेशंटची लगेच दखल घेतली जाते. मात्र गरीब लोक एकतर ससूनला घेऊन जातात अथवा दागदागिने गहाण ठेवून पैशाची व्यवस्था करून जवळच्याच खासगी दवाखान्यात अॅडमिट करतात. लोकांचा त्रास टाळण्यासाठी आंबेगाव, जुन्नर, खेड तालुक्यातील पेशंटला वायसीएममध्ये राखीव कोटा असावा. आयसीयू उपलब्ध व्हावा, अशी मागणी गावडे यांनी केली आहे. (वार्ताहर)