शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर तीन महिने पगाराविना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 06:19 AM2022-07-11T06:19:46+5:302022-07-11T06:20:17+5:30
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला निवेदन
शासकीय रुग्णालयात दिवसरात्र रुग्णांची सेवा करणाऱ्या निवासी डॉक्टरांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे अनेक डॉक्टरांना शिक्षणासाठी घेतलेल्या कर्जाचा ईएमआय भरता येत नाही. निवासी डॉक्टरांची संघटना सेंट्रल मार्डने डॉक्टरांची ही व्यथा वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर याच्याकडे मांडली आहे.
सेंट्रल मार्डच्या प्रतिनिधींनी निवासी डॉक्टरांना भेडसावणाऱ्या समस्या आणि त्यांच्या मागण्यांबाबत डीएमईआरचे संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. या चर्चेदरम्यान मार्डने सरकारकडे प्रलंबित असलेल्या प्रलंबित मागण्यांकडेही लक्ष वेधले आहे. डॉक्टरांच्या संरक्षणाचा प्रश्न अजूनही कायम असल्याचे सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. अविनाश दहिफळे यांनी सांगितले. या वेळी डॉ. धनराज गिते, डॉ. संगमेश्वर महाजन व इतर सहकारी उपस्थित होते.
याशिवाय शासकीय आणि पालिका रुग्णालयांचे विश्लेषण करण्याची मागणीही डॉक्टरांनी केली आहे. याशिवाय, वरिष्ठ डॉक्टरांची संख्या वाढवण्याचा आग्रह निवासी डॉक्टरांनी धरला आहे. जेणेकरून शासनाच्या डॉक्टरांचे बाँड धोरण अधिक बळकट करता येईल, असेही मत डॉक्टरांनी या वेळी मांडले.
औषधांचा तुटवडा कायम
सरकारी रुग्णालयामध्ये अजूनही औषधींचा तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांना बाहेरून औषधी आणण्यास सांगावे लागत असल्याने अनेक वेळा रुग्णांचे नातेवाईक व रहिवाशांमध्ये बाचाबाची होते. डॉक्टरांच्या वसतिगृहांचा प्रश्न अजूनही कायम असून, वसतिगृहांच्या घराची अवस्था दयनीय झाली आहे. तसेच जे. जे. रुग्णालयात १५०० रहिवाशांसाठी वसतिगृह बांधण्याची मागणी अनेक वेळा शासनाकडे करण्यात आली आहे. मात्र, या सर्व बाबींवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, असे दहिफळे यानी सांगितले.