निवासी डॉक्टरांचे आंदोलन सुरूच
By admin | Published: March 22, 2017 02:03 AM2017-03-22T02:03:16+5:302017-03-22T02:03:16+5:30
उच्च न्यायालयाने खडसावल्यानंतरही निवासी डॉक्टरांंनी आंदोलन सुरूच ठेवणार आहेत. रेसिडेंट डॉक्टर्स आॅफ महाराष्ट्रने मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
मुंबई : उच्च न्यायालयाने खडसावल्यानंतरही निवासी डॉक्टरांंनी आंदोलन सुरूच ठेवणार आहेत. रेसिडेंट डॉक्टर्स आॅफ महाराष्ट्रने मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. उच्च न्यायालयाने मंगळवारी या सामूहिक रजा आंदोलन प्रकरणी डॉक्टरांना फटकारले. मात्र तरीही ठोस कार्यवाही झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका त्यांनी बोलून दाखविली. केली. निवासी डॉक्टरांच्या या सामूहिक रजा आंदोलनामुळे राज्यभरात जवळपास ४०० शस्त्रक्रिया लांबणीवर गेल्या असून रुग्णांची वणवण सुरू आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्य सचिव डॉ. पार्थिव संघवी यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांपासून राज्यभरात सुरू असलेल्या निवासी डॉक्टरांच्या सामूहिक रजा आंदोलनाला इंडियन मेडिकल असोसिएशनचा पाठिंबा आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागील काही वर्षांपासून डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांची शासनाने तातडीने अंमलबजावणी करावी, ही प्रमुख मागणी आहे. प्रशासनाने त्वरित सुरक्षेविषयी कार्यवाही करावी. डॉक्टरांवर हल्ल्याची ५० प्रकरणांचे निकाल आजही प्रलंबित आहेत.
रुग्णालयांमध्ये शस्त्रधारी सुरक्षारक्षक आणि पोलिसांची नेमणूक करावी, अलार्म सिस्टीम असावी, हल्ला झालेल्या डॉक्टरने वैयक्तिक गुन्हा दाखल करण्याऐवजी त्याची जबाबदारी रुग्णालय वा संबंधित संस्थेने घ्यावी, या प्रकरणांचा निकाल जलदगती न्यायालयांमार्फत द्यावा, अशा आरोपींकरता कठोर शिक्षेची तरतूद असावी, तसेच होळी, गणेशचतुर्थी आणि गोपाळकाला अशा सणांदरम्यान अतिरिक्त सुरक्षेची तरतूद करावी या डॉक्टरांच्या प्रमुख मागण्या असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या युथ विंगचे अध्यक्ष डॉ. सागर मुंदडा यांनी सांगितले. (प्रतिनिधी)