रुग्णांसाठी मर मर मरायचे, वेतन मात्र काॅलेजने लाटायचे; ‘खासगी’ निवासी डॉक्टरांची कैफियत
By संतोष आंधळे | Published: August 25, 2023 05:56 AM2023-08-25T05:56:47+5:302023-08-25T05:57:07+5:30
विद्यावेतन द्या नाहीतर कारवाईला सामाेरे जावे लागेल: वैद्यकीय आयाेगाचा इशारा
संतोष आंधळे, लाेकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांना जेवढे विद्यावेतन (पगार) मिळते तेवढेही आम्हाला मिळत नाही. उलट जे विद्यावेतन आम्हाला मिळते तेही महाविद्यालयाचे प्रशासन आमच्याकडून काढून घेते, असे गंभीर आक्षेप देशातील नवोदित डॉक्टरांनी घेतले आहेत. निमित्त ठरले राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने खासगी महाविद्यालयांतील पदव्युत्तर निवासी डॉक्टर आणि पदवीधर डॉक्टर यांना किती विद्यावेतन दिले जाते, यासाठी केलेल्या सर्व्हेचे.
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने वरील विषयावर गुगल ऑनलाइन फॉर्मच्या माध्यमातून देशभरातील वैद्यकीय विद्यार्थ्यांचा सर्व्हे केला. त्यात विद्यावेतनासंदर्भात उद्वेगजनक मुद्दे समोर आले. या सर्व पार्श्वभूमीवर आयोगाने सर्व खासगी मेडिकल कॉलेजांच्या प्रशासनाला शासकीय रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांना जेवढे विद्यावेतन दिले जाते तेवढेच खासगी मेडिकल कॉलेजातील निवासी डॉक्टरांनाही देण्याचे आदेश दिले आहेत. नियमभंग केल्यास कठोर कारवाईचा इशाराही आयोगाने दिला आहे. वैद्यकीय आयोगाच्या पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण बोर्डाचे उपसचिव औजेंदर सिंग यांच्या स्वाक्षरीने हे पत्र गुरुवारी काढण्यात आले आहे.
विद्यावेतनातील तफावत गंभीर
- महाराष्ट्रात शासकीय रुग्णालयात विद्यावेतन मिळण्यावरून अनेकवेळा निवासी डॉक्टर संप करत असतात. मात्र देशातील खासगी रुग्णालयांतील अनेक निवासी डॉक्टरच्या विद्या वेतनाविषयावरून मोठी तफावत आहे.
- या सर्व प्रकरणाची वैद्यकीय आयोगाने गंभीर दखल घेतली असून यापुढे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील निवासी डॉक्टरांप्रमाणे विद्यावेतन न
- देणाऱ्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
सर्व्हेमध्ये काय?
- आयोगाने केलेल्या सर्व्हेमध्ये देशभरातून एकूण १०,१७८ विद्यार्थ्यांनी उत्तरे दिली.
- त्यात ७९०१ उत्तरे देणारे विद्यार्थी खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील पोस्ट ग्रॅज्युएट निवासी डॉक्टर आहेत.
- ७९०१ विद्यार्थी हे १९ राज्यांतील २ केंद्रशासित प्रदेशातील आणि २१३ महाविद्यालयांतील आहेत.