जालन्याच्या विकीची आईशी दोन वर्षांनी पुनर्भेट
By admin | Published: October 3, 2016 02:58 AM2016-10-03T02:58:18+5:302016-10-03T02:58:18+5:30
चैत्यभूमीवर आजीसोबत आला असताना मुंबईच्या गर्दीत हरवलेल्या १० वर्षीय विकीची त्याच्या आईशी तब्बल दोन वर्षांनी पुनर्भेट झाली.
पंकज रोडेकर,
ठाणे- चैत्यभूमीवर आजीसोबत आला असताना मुंबईच्या गर्दीत हरवलेल्या १० वर्षीय विकीची त्याच्या आईशी तब्बल दोन वर्षांनी पुनर्भेट झाली. तोतरा असताना आईला भेटण्याच्या प्रबलशक्तीने अखेर त्याची आईशी ठाणे शहर पोलिसांमुळे भेट झाली असून तो लवकरच घरी जाणार आहे.
जालना येथील अत्यंत गरीब घरातील विकी उपाते (पोटभरे) हा २०१४ मध्ये मुंबईत आजीसोबत आला होता. याचदरम्यान, दादर चैत्यभूमीवर गेला असताना त्यांची चुकामूक झाली. गर्दीत आजी सापडली नाही, म्हणून तो कसाबसा दादर रेल्वे स्थानकात आला. येथून आपल्या गावी ट्रेन जाईल म्हणून तो लोकलमध्ये बसला. त्याचदरम्यान, त्याला कल्याण स्थानकात पोलिसांनी त्याची रवानगी भिवंडी बालसुधारगृहात केली. तेथे तीन-चार महिने जात नाही, तोच त्याची रवानगी उल्हासनगर बालसुधारगृहात झाली. याचदरम्यान, त्याला आईची खूप आठवण येत असल्याने त्याने तेथून दोन ते तीन महिन्यांतच पळ काढला खरा, पण तो पोलिसांना रेल्वे स्थानकात भटकताना आढळला. त्यांनी त्यास मानखुर्दच्या बालसुधारगृहात जमा केले. येथे एक वर्ष होत असताना वारंवार येणाऱ्या पोलिसांकडे पाहून हेच आपल्या घरी नेतील, असा विश्वास त्याच्या मनात हळूहळू निर्माण होऊ लागला.
बदलापुरात हरवलेल्या मुलाच्या शोधासाठी ठाण्याचे चाइल्ड प्रोटेक्शन युनिट गेले असताना विकीने त्यांचे लक्ष वेधले. त्याने आईला भेटायचे आहे, तसेच जालन्यात शिकतो, असे सांगितले. या आधारे सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.एस. काळबांडे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक पी.एस. राणे, पोलीस हवालदार एम.एच.निकम, बी.बी.शिंगारे, छाया गोसावी आणि प्रमोद पालांडे आणि एन.बी. चव्हाण यांनी इंटरनेटद्वारे जालन्यातील सर्व शाळांशी संपर्क साधून त्याच्याबद्दल माहिती दिली.
आई हंगामी कामगार
गरीब कुटुंबातील विकीला वडील नाहीत. त्याची आई ऊसतोड कामगार आहे. तसेच सहा महिने आई एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कामाला जात असल्याने तो आणि त्याची मोठी भावंडे आजीसोबत जालन्यामध्ये राहतात, असे पोलिसांनी सांगितले.
>शिक्षकाची धडपड
ज्या शाळेत विकी शिकत होता, त्याच शिक्षकांना पोलिसांनी संपर्क साधल्यावर तो मुंबईत असल्याचा निरोप त्याच्या घरी पोहोचवला. तसेच त्याच्या घरी फोन अथवा मोबाइल नसल्याने शिक्षक हेच माध्यम ठरले होते. पोलिसांच्या संपकर् ात ते शिक्षक राहिल्याने तो आता घरी जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
>चाईल्ड प्रोटेक्शन युनिटची कामगिरी
मुलाच्या शोधासाठी ठाण्याचे चाइल्ड प्रोटेक्शन युनिट गेले असताना विकीने त्यांचे लक्ष वेधले. त्याने आईला भेटायचे आहे, असे सांगितले. त्याने केवळ विकी असे नाव सांगितले. आपले आडनाव सांगण्यासाठी त्याने पोटावरून हात फिरून ते भरलेले आहे, असून सांगून पोटभरे असून जालन्यात शिकतो, असे सांगितले. या आधारे सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.एस. काळबांडे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक पी.एस. राणे, हवालदार एम.एच.निकम यांनी माहिती घेतली.