निवासी वैद्यकीय अधिकारी काळे निलंबित
By admin | Published: June 15, 2016 02:06 AM2016-06-15T02:06:49+5:302016-06-15T02:06:49+5:30
रंगअंधत्व बनावट प्रमाणपत्रप्रकरणात निवासी वैद्यकीय अधिका-यासह वाशिमचे डॉ. सिसोदिया यांचे निलंबन.
अकोला: राज्य परिवहन महामंडळाच्या अकोला विभागातील चालकांना रंगअंधत्वाचा (कलर ब्लाइंडनेस) आजार दाखवून त्यांना बनावट प्रमाणपत्राद्वारे सुरक्षा रक्षकपदी नियुक्ती देऊन महामंडळाची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता काळे, वाशिमचे डॉ. हेमंत सिसोदिया यांना मंगळवारी निलंबित केले. यापूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामचंद्र गिरी यांना आरोग्य संचालनालयाने निलंबित केले होते. १३ एप्रिल रोजी खदान पोलिसांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामचंद्र गिरी यांच्यासह एसटीचे तत्कालीन विभाग नियंत्रक प्रशांत भुसारी, औरंगाबादचे कामगार अधिकारी लक्ष्मीकांत गवारे, सहायक कर्मचारी अधिकारी रमेश एडके, लिपिक प्रभाकर गोपनारायण, मानसेवी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.व्ही. तारे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संगीता काळे, वाशिमच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेखा मेंढे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. व्ही.डी. क्षीरसागर यांनी संगनमत करून बनावट प्रमाणपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता याप्रकरणी डॉ. गिरी यांच्यासह इतर डॉक्टरांचा अहवाल राज्याच्या आरोग्य संचालनालयाकडे पाठविला होता.