इंदिरानगरमधील रहिवासी ३५ वर्षे शौचालयाविना

By admin | Published: June 9, 2017 02:15 AM2017-06-09T02:15:41+5:302017-06-09T02:15:41+5:30

मुंबई ‘हागणदारी मुक्त’ केल्याचा दावा महापालिका करत असतानाच, दुसरीकडे वांद्रे पूर्वेकडील इंदिरानगरमधील रहिवासी तब्बल ३२ ते ३५ वर्षांपासून शौचालयापासून वंचित आहेत

Residents of Indiranagar for 35 years without toilets | इंदिरानगरमधील रहिवासी ३५ वर्षे शौचालयाविना

इंदिरानगरमधील रहिवासी ३५ वर्षे शौचालयाविना

Next

सागर नेवरेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई ‘हागणदारी मुक्त’ केल्याचा दावा महापालिका करत असतानाच, दुसरीकडे वांद्रे पूर्वेकडील इंदिरानगरमधील रहिवासी तब्बल ३२ ते ३५ वर्षांपासून शौचालयापासून वंचित आहेत. येथील महिलांना सुलभ शौचालयाचा आधार घ्यावा लागत असून, त्यांना त्याची किंमत मोजावी लागत आहेत. तर पुरुष उघड्यावर शौच करत असल्याचे चित्र असून, यामुळे पुन्हा एकदा महापालिकेच्या ‘हागणदारी मुक्त मुंबई’ मोहिमेचा बोजवारा उडाला आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदिरानगरमध्ये दोन हजार झोपड्या असून, येथील लोकसंख्या सुमारे ८ हजार आहे. इंदिरानगरच्या जलवाहिनीलगत कोठेही शौचालय नाही. येथे शौचालय नसल्याने स्थानिकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परिणामी, दुर्गंधीचे साम्राज्य पसरत असून, साथीचे आजार बळावण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. येथे दोन फिरत्या शौचालयांची व्यवस्था केली होती. मात्र, त्याचीही दुरवस्था झाली. शिवाय येथे पाण्याची व्यवस्था नसल्याने रहिवासी फिरत्या शौचालयाचा वापर करत नाहीत. दरम्यान, इंदिरानगर येथे युवा संस्था कार्यरत आहे. ही संस्था येथील लोकांच्या मूलभूत हक्कांसाठी लढा देत असते. या संस्थेनेही महापालिकेसोबत शौचालयासाठी पत्रव्यवहार केला आहे; परंतु अद्याप याची काहीच दखल घेतलेली नाही.
नागरिकांनी थेट संपर्क साधावा
आमच्याकडे याप्रकरणी अद्याप तक्रार दाखल झालेली नाही. अशी समस्या असेल आणि संबंधितांनी पत्रव्यवहार केले असतील, तर त्यांनी आमच्याजवळ असे पत्रव्यवहार घेऊन यावेत. एच/इस्ट वॉर्डमध्ये ३५७ सार्वजनिक शौचालये आहेत. परिणामी, अर्धा किलोमीटरवर शौचास जावे लागते, अशी परिस्थिती नाही. नागरिकांनी थेट संपर्क साधावा. समस्या सोडविली जाईल.
- धीरजकुमार बांगर,
सहायक आयुक्त, एच/इस्ट
कुठे आहे ‘स्वच्छ भारत अभियान’
इंदिरानगरमधील शौचालयप्रश्नी आम्ही पत्रव्यवहार केले. तेव्हा आम्हाला ही जागा रेल्वेची आहे, असे सांगण्यात आले. रेल्वे आम्हाला ‘ना हरकत प्रमाणपत्र’ देत नाही. परिणामी, शौचालय बांधण्यासाठी महापालिका परवानगी देत नाही. आम्ही वारंवार पत्रव्यवहार केले. मात्र, आम्हाला काहीच दाद दिली जात नाही. ‘स्वच्छ भारत अभियान’ नावापुरते सुरू असून, स्थानिकांना मूलभूत सेवा दिल्या जात नाहीत, ही खंत आहे.
- हाजी अलीम खान, स्थानिक नगरसेवक
महिलांची गैरसोय
शौचालयाची व्यवस्था नाही. परिणामी, महिलांची गैरसोय होते. सुलभ शौचालयासाठी वारंवार सांगितले जाते. मात्र, कोणी दखल घेत नाही. मतदानाच्या वेळी राजकीय नेते आमच्याकडे रोज येतात. मात्र, मतदान झाल्यावर आमच्याकडे कोणी फिरकत नाही.
- आशा हिवराळे, अध्यक्षा, श्रद्धा महिला बचतगट
शौचालयाच्या संदर्भात युवा संस्थेतील कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा आणि आमचा प्रश्न सोडवावा. सुलभ शौचालयासाठी पैसे देणे आमच्या आवाक्यात नाही.
- राधाबाई कांबळे, अध्यक्षा, साथी महिला बचतगट

Web Title: Residents of Indiranagar for 35 years without toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.