पालिका अधिकाऱ्यांना रहिवाशांनी दोन तास कम्पाउंडमध्ये डांबले

By admin | Published: June 16, 2017 01:26 AM2017-06-16T01:26:39+5:302017-06-16T01:26:39+5:30

कारवाईचे लेखी आदेश हाती नसताना सुरक्षारक्षकाची केबिन तोडल्याप्रकरणी रहिवाशांनी अधिकाऱ्यांनाच दोन तास कम्पाउंडमध्ये डांबल्याचा प्रकार चेंबूरच्या

Residents of the municipal corporation were stuck in the compound for two hours | पालिका अधिकाऱ्यांना रहिवाशांनी दोन तास कम्पाउंडमध्ये डांबले

पालिका अधिकाऱ्यांना रहिवाशांनी दोन तास कम्पाउंडमध्ये डांबले

Next

- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कारवाईचे लेखी आदेश हाती नसताना सुरक्षारक्षकाची केबिन तोडल्याप्रकरणी रहिवाशांनी अधिकाऱ्यांनाच दोन तास कम्पाउंडमध्ये डांबल्याचा प्रकार चेंबूरच्या टिळकनगर परिसरात गुरुवारी घडला. अखेर पोलिसांनी समजूत काढल्यानंतर रहिवाशांनी माघार घेत महापालिका अधिकाऱ्यांची सुटका केली.
चेंबूरच्या टिळकनगर परिसरातील दक्षता को-आॅप. सोसायटीमधील इमारत क्रमांक २५ मध्ये हा प्रकार घडला. इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर विकासकाने पदपथाला लागूनच सुरक्षारक्षकाची केबिन बांधली होती. याशिवाय या इमारतीमध्ये असलेल्या दुकानांमध्येही मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. याची तक्रार मिळताच महापालिकेच्या एम पश्चिम कार्यालयाने गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कारवाईसाठी घटनास्थळी धडक दिली. तक्रारीनुसार महापालिका अधिकाऱ्यांनी सुरक्षारक्षकाला केबिनबाहेर काढत केबिन जमीनदोस्त केली. मात्र या कारवाईबाबत महापालिकेने कोणतीही सूचना दिली नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला. शिवाय संतापलेल्या रहिवाशांनी कारवाईसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना घेराव घातला.
कारवाईच्या कागदपत्रांची मागणी करत रहिवाशांनी अधिकाऱ्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. मात्र समाधानकारक कागदपत्रे दाखवण्यात महापालिका अधिकारी अपयशी ठरले. त्यामुळे आवश्यक कागदपत्रांअभावी कारवाई केलीच कशी, अशा प्रश्नांची सरबत्तीच रहिवाशांनी सुरू केली. समाधानकारक उत्तरे अधिकाऱ्यांकडे नसल्याने रहिवाशांनी आक्रमक पवित्रा घेत इमारतीचे मुख्य प्रवेशद्वारच बंद केले. अधिकाऱ्यांना कम्पाउंडमध्ये डांबत रहिवाशांनी अधिकाऱ्यांच्या कारवाईचा निषेध नोंदवला. कारवाईला विरोध नाही, मात्र अनधिकृत बांधकाम असेल, तर त्याची रीतसर नोटीस देऊन कारवाई करावी. बेजबाबदारीने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणीही स्थानिकांनी केली आहे.

Web Title: Residents of the municipal corporation were stuck in the compound for two hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.