रहिवाशांनी विकास प्रस्ताव समजून घ्यावा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2016 01:56 AM2016-09-24T01:56:28+5:302016-09-24T01:56:28+5:30
अभ्युदय नगरच्या पुनर्विकासाबाबत रहिवाशांच्या मनातील शंकांचे निरसन करू, असा दावा अभ्युदय नगर सहकारी गृहनिर्माण संस्था संघाने केला
मुंबई : अभ्युदय नगरच्या पुनर्विकासाबाबत रहिवाशांच्या मनातील शंकांचे निरसन करू, असा दावा अभ्युदय नगर सहकारी गृहनिर्माण संस्था संघाने केला आहे. मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत संघाचे अध्यक्ष नंदकुमार काटकर बोलत होते.
काटकर म्हणाले की, येथील ३३ एकर परिसरात पसरलेल्या ४७ गृहनिर्माण संस्थांनी मिळून संघाची स्थापना केली आहे. संपूर्ण नगराचा विकास सामुदायिक पद्धतीने करण्याचा ठराव सर्व संस्थांनी एकत्र येत याआधीच केला आहे. त्यासाठी विकासक निवडीच्या प्रक्रियेत ५० टक्क्यांहून अधिक बहुमताची अट ठेवण्यात आली होती. त्याप्रमाणे चार विकासकांपैकी एका विकासकाची निवड निविदा प्रक्रियेद्वारे बहुमताने केली. या विकासकाने दिलेल्या प्रस्तावाबाबत रहिवाशांना माहिती मिळावी, म्हणून प्रत्येक गृहनिर्माण संस्थेतील चार प्रतिनिधींना आमंत्रित केले होते. यापुढेही अभ्युदय नगरमधील सर्व गृहनिर्माण संस्थांना २९ सप्टेंबरपर्यंत प्रस्तावाबाबत मार्गदर्शन करणार असल्याचे संघाने स्पष्ट केले.
दरम्यान, प्रस्तावित प्रकल्पानुसार येथील ३ हजार ४१० गाळेधारकांमध्ये ३ हजार २४० निवासी आणि १७० अनिवासी गाळ्यांची नोंद आहे. मात्र गेल्या ९ वर्षांपासून या सर्व गृहनिर्माण संस्थांचा एकत्रित विकासाचा प्रकल्प भिजत घोंगड्यात आहे. सुरुवातीच्या विकासकाला बाजूला सारून सर्व गृहनिर्माण संस्थांनी संघाची स्थापना केली आहे. त्यानंतर सुरू झालेल्या नव्या प्रक्रियेत नवा विकासक निवडण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी निश्चित केला होता. मात्र प्रत्यक्षात शासकीय मंजुरींअभावी या प्रक्रियेला २५ महिने लागले. आता विकासकाने सादर केलेल्या प्रस्तावानुसार, प्रत्येक रहिवाशाला शासनाच्या डीसीआर ३३(५)च्या धोरणानुसार ५३२ चौरस फूट अधिक विकासकाच्या नफ्यातून ५० चौरस फूट असे एकूण ५८२ चौरस फुटांचे घर मिळणार आहे. याउलट शासनाचे नवे धोरण प्रस्तावित असून, ते मंजूर झाल्यास रहिवाशांना नव्या प्रस्तावानुसार ६३४ चौरस फूट अधिक विकासकाच्या नफ्यातून ५० चौरस फूट असे ६८४ चौरस फुटांचे घर मिळणार आहे. (प्रतिनिधी)