३५०० वर्षांपूर्वीच्या वस्तीचे अवशेष!
By admin | Published: October 26, 2015 02:41 AM2015-10-26T02:41:08+5:302015-10-26T02:41:08+5:30
शंखांपासून बांगड्या तयार करणाऱ्या कारागीरांची वस्ती माणगंगेकाठी सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात असावी, अशा निष्कर्षाप्रत नेणारे पुरावे माण तालुक्यात सापडले आहेत
राजीव मुळ्ये, सातारा
शंखांपासून बांगड्या तयार करणाऱ्या कारागीरांची वस्ती माणगंगेकाठी सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात असावी, अशा निष्कर्षाप्रत नेणारे पुरावे माण तालुक्यात सापडले आहेत. पृष्ठीय सर्वेक्षणात आढळलेले असंख्य अवशेष थेट सातवाहन काळात नेणारे असून, कारागीरांनी वापरलेली अवजारे उत्तर ताम्रपाषाणयुगातील असल्याचा अंदाज आहे.
माण तालुक्यातील एका गावाजवळ माणगंगा नदीकिनारी प्रचंड संख्येने आढळलेले शंखांच्या बांगड्यांचे कातकाम केलेले तुकडे, बांगडी घासण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सहाणी, कोरीवकामासाठी वापरल्या जाणाऱ्या सूक्ष्माश्म अवजारांचे तुकडे पाहता, निर्यातीसाठी बांगड्या बनविण्याचा कारखानाच इथे अस्तित्वात होता, या निष्कर्षाप्रत अभ्यासक पोहोचले आहेत.
सातारच्या जिज्ञासा इतिहास संशोधन संस्थेच्या सदस्यांनी हा ‘खजिना’ शोधून काढला असून, तिथे मोठ्या प्रमाणात अजूनही दिसत असलेल्या इतर अवशेषांना धक्का लागू नये, म्हणून त्यांनी ठिकाण गोपनीय ठेवले आहे.
येथे अत्यंत प्राचीन संस्कृतीचा ठेवा गवसण्याची चिन्हे दिसू लागल्यानंतर उत्खननाशी संबंधित संस्थेशी संपर्क साधण्यात आला आहे.
इथे सापडलेले शंख ‘टर्बुनिल्ला पायरम’ जातीचे असून, ते केवळ तामिळनाडू किंवा सौराष्ट्रातील खंबातच्या आखातात सापडतात. माणमध्ये सापडलेले शंख खंबातच्या आखातातील असावेत, असे दिसते. लाटेबरोबर वाहत आलेल्या मोठ्या शंखाच्या पोटात लहान शंख आढळतात, तेही इथे आढळले असून, बांगड्या बनविताना शंखाचा काढून टाकलेला गाभाही सापडला आहे. पांढरीच्या टेकाडांचे संरक्षण करून ठिकठिकाणी उत्खनन झाल्यास, निसर्ग पर्यटनाबरोबरच जिल्ह्यात ऐतिहासिक पर्यटनाला चालना मिळेल.
- विक्रांत मंडपे, जिज्ञासा इतिहास संशोधन संस्था