आणखी बारा नगरसेवकांचे राजीनामे; आयुक्तांकडे रीघ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2017 02:20 PM2017-02-02T14:20:07+5:302017-02-02T14:20:07+5:30
नवीन घरोबा केलेला, अद्याप उमेदवारी निश्चिती नाही, पक्षाकडून यादी घोषित होत नाही
नाशिक : नवीन घरोबा केलेला, अद्याप उमेदवारी निश्चिती नाही, पक्षाकडून यादी घोषित होत नाही या विवंचनेत अडकलेल्या पक्षबदलू नगरसेवकांच्या मागे राजीनाम्याचे झेंगाट लागले आहे. भविष्यात पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यात सापडू नये यासाठी बुधवारी आणखी डझनभर नगरसेवकांनी आपल्या सदस्यत्वाचे राजीनामे आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्याकडे सादर केले. त्यामुळे दोन दिवसांत राजीनामे देणाऱ्या नगरसेवकांची संख्या आता १४ झाली आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर केल्यानंतर भविष्यात कायद्याच्या चौकटीत अडकून भलते संकट ओढवले जाऊ नये, याची खबरदारी घेत मंगळवारी कॉँग्रेसचे शिवाजी गांगुर्डे व मनसेचे शशिकांत जाधव यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिला होता. दोन्ही नगरसेवकांच्या राजीनाम्यानंतर उर्वरित पक्षबदलू नगरसेवकही खडबडून जागे झाले आणि बुधवारी राजीनामा देण्यासाठी आयुक्तांकडे रीघच लागली. बुधवारी दिवसभरात बारा नगरसेवकांनी राजीनामे सुपूर्द केले. त्यात प्रभाग ४३ मधील मनसेचे नगरसेवक अरविंद शेळके, प्रभाग ३३ मधील मनसेचे अशोक सातभाई, प्रभाग १६ मधील मनसेच्या रेखा बेंडकोळी, प्रभाग ५५ मधील सेनेच्या कोमल मेहरोलिया, प्रभाग २५ मधील मनसेच्या माधुरी जाधव, प्रभाग ३९ मधील मनसेचे गुलजार कोकणी, प्रभाग ३० मधील मनसेच्या अर्चना थोरात, प्रभाग ५३ मधील मनसेचे सतीश सोनवणे, प्रभाग ३३ मधील राष्ट्रवादीच्या रंजना बोराडे, प्रभाग १७ मधील कॉँग्रेसच्या लता दिनकर पाटील, प्रभाग २ मधील कॉँग्रेसचे उद्धव निमसे आणि प्रभाग २४ मधील मनसेच्या सुनीता मोटकरी यांचा समावेश आहे. त्यामुळे पक्षांतर केलेल्या ४३ नगरसेवकांपैकी १४ नगरसेवकांनी आपले राजीनामे प्रत्यक्ष आयुक्तांकडे जाऊन सुपूर्द केले आहेत.