राजीनामे मंजूर, आमदारांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ घटले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 07:28 AM2019-04-01T07:28:21+5:302019-04-01T07:28:54+5:30

भाजप-शिवसेना युतीमुळे नाराज झाल्याने वरोरा-भद्रावतीचे शिवसेना आमदार सुरेश धानोरकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून ते काँग्रेसच्या तिकीटावर चंद्रपूर मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत.

The resignation of the MLAs, the resignation of the MLAs resulted in the decline of the strength of the Shiv Sena | राजीनामे मंजूर, आमदारांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ घटले

राजीनामे मंजूर, आमदारांच्या राजीनाम्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ घटले

Next

मुंबई : विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या हर्षवर्धन जाधव, प्रताप पाटील चिखलीकर व सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर या तीन बंडखोर आमदारांमुळे शिवसेनेचे विधानसभेतील संख्याबळ ६३ वरून ६० वर आले आहे.

भाजप-शिवसेना युतीमुळे नाराज झाल्याने वरोरा-भद्रावतीचे शिवसेनाआमदार सुरेश धानोरकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असून ते काँग्रेसच्या तिकीटावर चंद्रपूर मतदारसंघातून रिंगणात उतरले आहेत. भाजपकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांना टीकेचे लक्ष्य बनविले होते, तेव्हापासून काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार हे धानोरकर यांच्या संपर्कात होते. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील वरोरा, चंद्रपूर, राजुरा, वणी व आर्णी हे पाच विधानसभा मतदारसंघ कुणबीबहुल आहेत. काँग्रेसलाही कुणबी समाजाचा युवा चेहरा हवा होता. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.
कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनीही बंडाचा झेंडा फडकावला असून ते औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. जाधव यांच्या बंडखोरीमुळे खैरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मराठा आरक्षणासाठी आत्मदहन करणाऱ्या काकासाहेब शिंदेंबाबत सहानुभूती व्यक्त करत जाधव यांनी यापूर्वीही राजीनामा दिला होता. मात्र तो मंजूर झाला नव्हता. लोहा विधानसभेचे विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही शिवसेनेला सोडचिठ्ठ दिली असून ते भाजपकडून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याविरोधात नांदेडमधून निवडणूक लढवित आहेत. नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत चिखलीकरांनी पक्ष आदेश डावलून भाजपला मदत केली होती.

राजीनामे मंजूर
जाधव, चिखलीकर व धानोरकर यांचे राजीनामे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंजूर केले आहेत. त्यामुळे तिन्ही विधानसभांच्या जागा रिक्त झाल्या असून केंद्रीय निवडणूक आयोगाला यासंदर्भात अहवाल देण्यात आला आहे. केवळ सहा महिने शिल्लक राहिल्याने येथे पोटनिवडणुकीची शक्यता नाही.

Web Title: The resignation of the MLAs, the resignation of the MLAs resulted in the decline of the strength of the Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.