भाजपाच्या २०५ पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा राजीनामा; पक्षाच्या उमेदवाराबद्दल नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 11:52 AM2024-03-19T11:52:41+5:302024-03-19T11:53:21+5:30
रावेरमधून यंदा रक्षा खडसे या भाजपाच्या उमेदवार असल्या तरी त्यांचे सासरे एकनाथ खडसे हे भाजपासोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आहेत
जळगाव - Raksha Khadse ( Marathi News ) रक्षा खडसे ह्या भाजपाच्या खासदार आहेत. पण भाजपापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्या जास्त मदत करतात असा आरोप करत आणि त्यांच्या लोकसभा उमेदवारीला विरोध करत वरणगावसह परिसरातील भाजपाच्या २०५ पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्याकडे पाठविले आहेत. वरणगाव येथील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बूथ प्रमुख व सुपर वॉरियर यांची बैठक रविवारी झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला.
भाजपातर्फे रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. याविरुद्ध तीव्र पडसाद उमटत आहेत. त्यामध्ये यावल, रावेर, चोपडा या तालुक्यांमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले. तसेच भुसावळ, बोदवड व मुक्ताईनगरातही याचे लोण पोहचले आहेत.
गिरीश महाजनांवरील टीकेचा मुद्दा उपस्थित...
रक्षा खडसे यांच्या कुटुंबातील काही सदस्यांकडून भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यावरदेखील टीका करण्यात आली होती. त्यावेळीही त्यांनी एकदाही राष्ट्रवादीला विरोध केला नाही. त्यामुळे भाजपाने पुन्हा त्यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी सामूहिक राजीनामा देणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
या पदाधिकाऱ्यांचा राजीनामा...
राजीनामा देणाऱ्यांमध्ये माजी नगराध्यक्ष सुनील काळे, माजी उपनगराध्यक्ष शेख अखलाक शेख युसुफ, ओबीसी शहराध्यक्ष गोलू राणे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष आकाश निमकर, शहराध्यक्ष सुनील माळी, तालुका उपाध्यक्ष माला मेढे, शामराव धनगर, महिला शहर अध्यक्ष प्रणिता पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैंसे, अल्पसंख्याक जिल्हा सरचिटणीस डॉ. सादीक शेख, जिल्हा उपाध्यक्ष हाजी फायुम, कायदे आघाडी सरचिटणीस अँड. ए. जी. जंजाळे यांच्यासह २०५ जणांच्या सह्यांचे पत्र जे. पी. नड्डा यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.
दरम्यान, रावेरमधून यंदा रक्षा खडसे या भाजपाच्या उमेदवार असल्या तरी त्यांचे सासरे एकनाथ खडसे हे भाजपासोडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आहेत. त्यामुळे एकनाथ खडसे हे रक्षा खडसेंविरोधात काम करणार आहेत. पहिल्यांदाच रावेरमध्ये खडसेविरुद्ध खडसे अशी निवडणूक होणार असून राष्ट्रवादीकडून अद्याप कुठलीही अधिकृत उमेदवारी जाहीर झाली नाही. मात्र माजी आमदार संतोष चौधरी यांच्या समर्थकांनी उमेदवारी जाहीर न होताच फटाके फोडले आहेत.