महायुती सरकारमधील एका मंत्र्याचा राजीनामा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना दिलं पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 08:21 AM2024-06-24T08:21:03+5:302024-06-24T08:21:49+5:30
लोकसभा निवडणुकीच्या निकालात ज्यांना यश मिळालं अशा आमदारांना आणि मंत्र्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो.
मुंबई - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून काही मंत्री, आमदारांना मैदानात उतरवलं होतं. त्यातील जे निवडणुकीत विजयी झाले त्यात मंत्री संदीपान भुमरे यांचाही समावेश होता. संदीपान भुमरे हे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेत. मविआच्या चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांचा भुमरेंनी पराभव केला. लोकसभेत विजयी झाल्यानंतर संदीपान भुमरे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे सोपवला आहे.
याबाबत आमदार संजय शिरसाट म्हणाले की, लोकसभेची निवडणूक निवडून आल्यानंतर १४ दिवसांत २ पदांपैकी एकाचा राजीनामा द्यावा लागतो. संदीपान भुमरे हे आता दिल्लीत खासदार राहतील. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात किंवा त्यांच्याकडील विभागाचे निर्णय घेण्याचा अधिकार आता भुमरेंकडे राहिला नाही. भुमरेंकडील खाते हे मुख्यमंत्र्यांकडे आले आहे असं त्यांनी म्हटलं.
मंत्रिमंडळ विस्तार कधी?
तसेच मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा आहेत. काहीजण आपापल्या परीने तर्क लढवत आहेत. कोणी काही ना काही तारखा देतोय. परंतु जोपर्यंत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ठरवत नाहीत तोपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होणार नाही. त्यामुळे आमच्यासारख्यांना हा प्रश्न विचारण्यापेक्षा वरिष्ठ नेत्यांना हे विचारलं तर त्याचे योग्य उत्तर तुम्हाला मिळेल असं सांगत संजय शिरसाट यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर भाष्य केले आहे.
पालकमंत्रिपदी कुणाला संधी?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले संदीपान भुमरे हे खासदार झाले आहेत. नियमानुसार भुमरेंना दोन्हींपैकी एकाच सभागृहाचे सदस्यत्व ठेवावे लागणार आहे. त्यांनी आमदारकी आणि मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर त्यांचेकडील रोहयो, फलोत्पादन खाते व पालकमंत्रिपदही रिक्त होणार आहे. त्या पदावर वर्णी लागावी, यासाठी शिंदेसेनेअंतर्गत जोरदार स्पर्धा लागल्याची माहिती आहे. भुमरे यांना पश्चिम मतदारसंघातून सर्वाधिक जास्त मताधिक्य देऊन आ. संजय शिरसाट हे मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळण्यासह पालकमंत्रिपदाचे दावेदार असल्याचे बोलले जात आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी होईल, असा दावा सध्या सत्ताधारी करीत आहेत. विस्तार झाला तर शिरसाट यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.