शिंदे गटालाही फुटीची लागण; यवतमाळ जिल्हाप्रमुखाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे राजीनामा

By विशाल सोनटक्के | Published: January 13, 2023 08:13 PM2023-01-13T20:13:35+5:302023-01-13T20:15:28+5:30

बाजार समितीचे सभापतिपदही सोडले : दाेन महिन्यांपूर्वीच संजय राठोड यांनी केली होती जिल्हाप्रमुख नियुक्ती

Resignation of Yavatmal District Chief Gajanan Bejankiwar to CM Eknath Shinde | शिंदे गटालाही फुटीची लागण; यवतमाळ जिल्हाप्रमुखाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे राजीनामा

शिंदे गटालाही फुटीची लागण; यवतमाळ जिल्हाप्रमुखाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे राजीनामा

googlenewsNext

यवतमाळ - शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष गजानन बेजंकीवार यांनी आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सोपविल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. जिल्हाध्यक्षपदाबरोबरच पांढरकवडा बाजार समितीच्या सभापतिपदाचाही राजीनामा दिल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ते आपल्या राजीनाम्यावर ठाम राहतात की, पक्षश्रेष्ठींच्या हस्तक्षेपानंतर राजीनामा मागे घेतात, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर संजय राठोड यांनी सेनेला जय महाराष्ट्र करून शिंदे गटात प्रवेश केला. राठोड यांच्या या बंडावेळीही गजानन बेजंकीवार हे त्यांच्या सोबत होते. मागील सुमारे २० ते २५ वर्षांपासून बेजंकीवार सेनेत कार्यरत असून, राठोड यांचे विश्वासू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. जिल्हा परिषद सदस्य आणि त्यासोबतच पांढरकवडा बाजार समितीच्या सभापतिपदाची धुरा त्यांच्याकडे आहे. महिनाभरापूर्वीच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली होती. या कार्यकारिणीतही गजानन बेजंकीवार यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद सोपवीत पक्षाने आर्णी व वणी या तालुक्यांची धुरा त्यांच्या खांद्यावर दिली होती.

पांढरकवडा तालुक्यातील ग्रामीण भागात बेजंकीवार यांना मानणारा मोठा वर्ग असल्याने त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करताना सहकार्य, संवाद आणि विश्वास या कार्यसूत्रीने जिल्ह्यात बाळासाहेबांची शिवसेना वाढविण्याचा निश्चय करण्यात आला होता. तशी अपेक्षा मंत्री संजय राठोड यांनी व्यक्त केली होती. मात्र, अवघ्या महिनाभरातच बेजंकीवार यांनी राजीनामा दिल्याने शिंदे गटालाही जिल्ह्यात फुटीची लागण झाल्याचे दिसून येत आहे.

पांढरकवडा बाजार समितीच्या सभापतिपदावरून जिल्ह्यातील शिंदे गटात सध्या धुसफूस सुरू आहे. याच कारणावरून बेजंकीवार यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदासह बाजार समितीच्या सभापतिपदाचाही राजीनामा दिल्याची प्राथमिक माहिती पुढे येत आहे. पांढरकवडा बाजार समितीची फेब्रुवारी २०१९ मध्ये निवडणूक झाली होती. १८ संचालक निवडून आले होते. रुंझा मतदारसंघातून निवडून आलेल्या जानमहंमद अब्दुलभाई जिवाणी यांची सभापतिपदी वर्णी लागली, तर खैरगाव दे मतदारसंघातून निवडून आलेल्या प्रेमदास पांडू राठोड यांची उपसभापतिपदी वर्णी लागली.

जिवाणी यांनी अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर गजानन बेजंकीवार यांची सभापतिपदी निवड करण्यात आली. उपसभापतिपदी प्रेमदास राठोड पूर्वीप्रमाणे कायम राहिले. आता बेजंकीवार यांच्या उपसभापतिपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळही संपत आला आहे. या पदावर आता कोणाला संधी द्यायची, याची चाचपणी शिंदे गटाच्या पक्षश्रेष्ठींकडून केली जात आहे. याच मुद्द्यावरून मतभेद निर्माण होऊन बेजंकीवार यांनी बाजार समितीच्या सभापतिदाबरोबरच बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाचाही राजीनामा दिल्याचे समजते. पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा पाठविल्याचे समजल्यानंतर बेजंकीवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा मोबाइल स्वीच ऑफ होता.

पक्षश्रेष्ठींशी बोलून मार्ग काढू

गजानन बेजंकीवार यांनी जिल्हाध्यक्षपदासह बाजार समितीच्या सभापतिपदाचाही राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सोपविल्याचे समजल्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे संपर्क प्रमुख हरिहर लिंगनवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बेजंकीवार यांचा राजीनामा आपल्याकडे आलेला नाही. मात्र, पांढरकवडा बाजार समितीच्या सभापतिपदासंंदर्भात काही मुद्दे आहेत. पक्षश्रेष्ठींशी बोलून मार्ग काढण्याचा प्रयत्न असल्याचे लिंगनवार यांनी सांगितले.

...तर जिल्ह्यात शिंदे गटाच्या अडचणी वाढणार

शिवसेनेतील बंडाळीनंतर संजय राठोड यांनी शिंदे गटाचा हात धरला. राठोड यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर जिल्हा शिवसेनेत मोठी बंडाळी माजेल, असा कयास होता. मात्र, मोठ्या संख्येने शिवसैनिक तसेच पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला. दुसरीकडे माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांच्यासह अनेकांनी पुन्हा सेनेत प्रवेश करीत एकप्रकारे सेनेला बळकटी दिली असताना बेजंकीवार यांच्या रुपाने शिंदे गटालाही फुटीची लागण झाल्याचे पुढे येत आहे. बेजंकीवार राजीनाम्यावर ठाम राहिल्यास येणाऱ्या काळात जिल्ह्यात शिंदे गटासमोरील अडचणी आणखी वाढण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

Web Title: Resignation of Yavatmal District Chief Gajanan Bejankiwar to CM Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.