राजीनामा सत्र, बाहेरून आलेले आमदार भाजपात अस्वस्थ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 07:10 AM2018-11-13T07:10:55+5:302018-11-13T07:11:17+5:30
राजीनामा सत्र : आशिष देशमुख यांच्यानंतर आता अनिल गोटेही देणार राजीनामा
मुंबई : अन्य पक्षांतून भाजपात आलेले आमदार अस्वस्थ असल्याचे धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांच्या निमित्ताने समोर आले आहे. या आधी काटोलचे आमदार आशिष देशमुख यांनी भाजपाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. आशिष देशमुख यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका करीत पक्ष सोडला. गोटे यांनी अद्याप तसा पवित्रा घेतलेला नाही. मात्र धुळ्याच्या स्थानिक राजकारणात पक्षाकडूनच अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याने ते आमदारकीचा राजीनामा देणार आहेत. धुळे महापालिका निवडणुकीत आ. गोटे विरुद्ध जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यात चांगलीच जुंपली आहे.
भाजपात बाहेरून आलेले ३५ हून अधिक आमदार आहेत. त्यांच्यापैकी कोणालाही मंत्रिपद मिळालेले नाही. शिवाय, ज्या सहा अपक्ष आमदारांनी भाजपाला पाठिंबा दिलेला आहे ; त्यांनाही मंत्रीपदाची संधी मिळालेली नाही. दोन-तीन जणांचे महामंडळांवर समाधान करण्यात आले आहे.
गोटे विधानसभेत आक्रमक
गोटे हे विधानसभेत काँग्रेस-राष्ट्रवादीवर तुटून पडतात. आघाडी सरकारमधील भानगडी ते तावातावाने मांडतात. पक्षाच्या शाऊटिंग ब्रिगेडचे ते सदस्य आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत. गेल्या सोमवारी ‘वर्षा’वर जाऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर कैफियत मांडली होती. गोटे १९९९ मध्ये समाजवादी पार्टीचे आमदार होते. २००४ मध्ये ते पराभूत झाले. २००९ लोकसंग्राम पार्टीचे आमदार होते. तर २०१४ मध्ये ते भाजपाकडून आमदार झाले.
प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांना भाजपा कार्यकर्त्यांच्या रोषास सध्या सामोरे जावे लागत आहे. भुसावळमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी त्यांना जाब विचारला. धुळ्यात त्यांच्या दानवेंच्या उपस्थितीत झालेल्या सभेत प्रचंड गदारोळ झाला होता.
धुळे मनपात भाजपा विरुद्ध भाजपा
दोन गट; आमदार गोटे, केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे आमने-सामने
लोकमत न्यूज नेटवर्क
धुळे : भाजपा आमदार अनिल गोटे यांनी बंडाचे निशान फडकावल्यामुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपा विरुद्ध विरुद्ध भाजपा असा सामना रंगणार आहे. गोटे यांच्या गटातर्फे १९३ इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्यानंतर सोमवारपासून भाजपाच्या दुसऱ्या गटातर्फे मुलाखतीचा कार्यक्रम सुरू झाला.
पहिल्या दिवशी इच्छुकांच्या मुलाखतीकडे पक्षाचे प्रभारी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी मात्र पाठ फिरविली.
गोटे यांनी दसºयाच्या दिवशी भाजपाचे प्रचार कार्यालय थाटले. त्यानंतर पक्षातर्फे २०१ इच्छुकांच्या मुलाखतीही झाल्या. गोटेंसोबत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक व भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष सुनील नेरकर व आजी- माजी पदाधिकारी उपस्थित होते.
दुसरा गट केंद्रीय डॉ. सुभाष भामरे, गिरीश महाजन, जयकुमार रावल यांचा आहे. त्यांच्या गटातर्फे सोमवारी एक ते नऊ प्रभागातील इच्छुकांच्या मुलाखती झाल्या.
दुसरा गट केंद्रीय डॉ. सुभाष भामरे, गिरीश महाजन, जयकुमार रावल यांचा आहे. त्यांच्या गटातर्फे पक्षासाठी महानगर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, धुळे महानगर प्रभारी आ. स्मिता वाघ, कोअर कमिटी सदस्य विनोद मोराणकर, उपाध्यक्ष ओम खंडेलवाल माजी महापौर जयश्री अहिरराव यांनी मुलाखती घेतल्या.
गोटे देणार राजीनामा
१९ नोव्हेंबरला विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आमदारकीचा राजीनामा अध्यक्षांना सादर करणार असल्याचे आमदार अनिल गोटे यांनी सोमवारी सांगितले. अजूनही आपण भाजपामध्येच असल्याचेही ते म्हणाले़