नुकसानग्रस्तांना वाटाण्याच्या अक्षता
By admin | Published: June 10, 2016 03:16 AM2016-06-10T03:16:48+5:302016-06-10T03:16:48+5:30
रिअॅक्टर स्फोटामुळे परिसरातील तीन हजार घरांचे तब्बल सहा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे
अनिकेत घमंडी,
डोंबिवली- एमआयडीसीतील ‘प्रोबेस एंटरप्रायजेस’ या रासायनिक कंपनीतील रिअॅक्टर स्फोटामुळे परिसरातील तीन हजार घरांचे तब्बल सहा कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती पंचनाम्यांमुळे उघडकीस आली आहे. मात्र, मालमत्तेचे नुकसान झालेल्यांना कोणतीही मदत मिळण्याची शक्यता नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
स्फोटात जखमी झालेल्या रुग्णांच्या उपचाराचा खर्च सरकारतर्फे केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, भरपाई देण्याबाबत त्यांनी काहीच जाहीर केलेले नव्हते. तसेच तपासअधिकारी व मदतकार्य करणाऱ्या पथकांना काहीच सूचितही केलेले नाही. त्यामुळे जरी पंचनामे झाले असले, तरीही मदत मिळेलच, याची शाश्वती नाही, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.
स्फोटात जखमी झालेल्या २०८ जणांवर दहाहून अधिक रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले. त्यावर, २६ ते २७ लाख रुपयांचा खर्च झाला आहे. त्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे सोमवारपर्यंत पाठवण्यात येणार आहे. तो खर्च संबंधित रुग्णालयांना मिळेल.
>सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडणार
प्रोबेस कंपनीतील स्फोटात १२ जणांचा बळी गेला.
२०८ जणांना दुखापत झाली, त्यातील १४ जणांना गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या होत्या. तर, अजूनही दोघे जण उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे.
मृतांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
ज्यांच्या घरांचे नुकसान झाले, त्यांच्यापुढे मोडलेला संसार पुन्हा कसा उभा करायचा, असा यक्षप्रश्न आहे. असे असतानाच नुकसानभरपाईवरही पाणी सोडायचे झाल्यास सर्वसामान्यांचे कंबरडेच मोडणार आहे.
विद्युत उपकरणेही बाद
स्फोटाच्या हादऱ्यामुळे कंपनीच्या परिसरातील घरे, दुकाने, शोरुम्स व कंपन्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक घरांच्या काचांच्या खिडक्या, दरवाजे तुटले आहेत. तर, काही ठिकाणी भिंतींना तडेही गेले आहेत. अनेकांच्या फ्रीज, टीव्ही यासह अन्य विद्युत उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कंपन्यांनाही ठेंगा
या स्फोटात ६५ कंपन्यांचे किती नुकसान झाले, याबाबतची माहिती संकलित करण्याचे काम अजूनही सुरू आहे. त्या कंपन्यांनी विमा काढला होता का, तसे असल्यास त्यांना किती भरपाई मिळू शकते, याबाबतचीही माहिती घेण्यात येत आहे. मात्र, तीही मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.