बॅँकांविरोधात नेटकऱ्यांचा टिष्ट्वटरवर संताप
By Admin | Published: July 5, 2017 04:54 AM2017-07-05T04:54:03+5:302017-07-05T04:54:03+5:30
बँकेतील प्रत्येक व्यवहार अथवा सेवेवर शुल्क आकारण्याच्या बँकांच्या धोरणावर आज नेटकऱ्यांनी चांगलेच तोंडसुख घेतले. अनेक बँकांनी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बँकेतील प्रत्येक व्यवहार अथवा सेवेवर शुल्क आकारण्याच्या बँकांच्या धोरणावर आज नेटकऱ्यांनी चांगलेच तोंडसुख घेतले. अनेक बँकांनी सध्या विविध अटी आणि नियम लादण्याचा सपाटा लावला आहे. एटीएमच्या वापरापासून खात्यात रोख रक्कम जमा करण्यावरही मर्यादा टाकत दंड आकारणीचा अजब कारभार चालविला आहे. बँकांच्या या मनमानी कारभाराविरोधात मुंबई काँग्रेस आणि मनी लाइफ फाउंडेशनने मंगळवारी ‘बँक से बचाओ’ या हॅशटॅगने टिष्ट्वटरवर मोर्चा काढला.
मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम आणि मनी लाइफ फाउंडेशनच्या विश्वस्त सुचेता दलाल यांच्या पुढाकाराने मंगळवारी प्रभादेवी येथील रवींद्र नाट्यमंदिर येथून टिष्ट्वट मोर्चाला सुरुवात करण्यात आली. ‘बँक से बचाओ’ असा हॅशटॅग वापरत बँकांच्या जाचक अटी आणि दंडाच्या नावाखाली पैसे उकळण्याचा जो उद्योग बँकांनी चालविला आहे त्यावर नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
अनेकांनी आपल्या टिष्ट्वटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांना टॅग करत बँकांच्या जाचक अटीतून सुटका करण्याची मागणी केली. बँकांविरोधात सुरू झालेले हे अनोखे आंदोलन काही काळ टिष्ट्वटर ट्रेंडिंगमध्येही होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक इस्रायल दौऱ्याला सुरुवात होईपर्यंत ‘बँक से बचाओ’ हे हॅशटॅग ट्रेंडिंगमध्ये होते.
सामान्य ग्राहकांना धरले वेठीला
पाच हजारपेक्षा कमी रक्कम खात्यात असेल तर दंड, तीनपेक्षा जास्त ट्रँजॅक्शन्स झाल्यास दंड, आपल्याच खात्यात दीड लाखापेक्षा जास्त पैसे भरायचे असतील तरीही दंड, असा बँकांचा अजब कारभार सुरू आहे. मोठ्या उद्योजकांनी हजारो कोटींची कर्जे बुडवली आहेत. त्याच्या भरपाईसाठी सामान्य ग्राहकांना वेठीस धरले जात आहे. जास्तीत जास्त दंड आकारून शोषण सुरू आहे, असा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी टिष्ट्वटरवर सक्रिय असतात. बँकेच्या दंडआकारणीमुळे त्रस्त झालेल्या जनतेने टिष्ट्वटरच्या माध्यमातून आपला रोष प्रकट करावा यासाठीच टिष्ट्वटर मोर्चा काढला होता. या अभियानाला देशभरातून चांगला प्रतिसाद लाभला. लोकांनी आपल्या व्यथा मांडल्याचे निरुपम यांनी सांगितले.