मराठा आरक्षणावरून विरोधकांचा सभात्याग

By admin | Published: April 12, 2016 03:09 AM2016-04-12T03:09:19+5:302016-04-12T03:09:19+5:30

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. उलटपक्षी गतसरकारने मराठा आरक्षणाबाबत जे केले नाही, ते आम्ही करत आहोत, असे वक्तव्य उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद

Resistance of opposition from Maratha Reservation | मराठा आरक्षणावरून विरोधकांचा सभात्याग

मराठा आरक्षणावरून विरोधकांचा सभात्याग

Next

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत आम्ही सकारात्मक आहोत. उलटपक्षी गतसरकारने मराठा आरक्षणाबाबत जे केले नाही, ते आम्ही करत आहोत, असे वक्तव्य उच्च व तंत्रशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी विधानपरिषदेत करताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला. विशेष म्हणजे, तावडे यांच्या या वक्तव्यावर मराठा आरक्षणाबाबत चालढकल आणि हयगय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि विधान परिषद सदस्य विक्रम काळे यांनी सभात्याग केला.
मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यापासून त्यावर न्यायालयात स्थगिती मिळेपर्यंतच्या काळात नोकरी मिळालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र प्राप्त झाले नसल्याचा मुद्दा विनायक मेटे यांनी लक्षवेधीद्वारे मांडला. शिवाय, अशा उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याबाबत अधिकारी वर्गाकडून चालढकल करण्यात येत असल्याचे म्हणणे मांडले.
यावर उत्तर देताना मंत्री तावडे म्हणाले, ‘मराठा समाजाला आरक्षण घोषित झाले असले, तरी न्यायालयात त्यावर स्थगिती आली आहे. दरम्यानच्या काळात नोकरी मिळालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्र मिळाले नसल्याची वस्तुस्थिती असली, तरी या प्रकरणी न्यायालयात ‘सिव्हील अपील’ दाखल करण्यात आले आहे. सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर या प्रकरणातील सत्यताही तपासली जाईल.
यावर मेटे यांनी सुमारे १७००-१८०० उमेदवारांचा हा प्रश्न असून, त्यामुळे समाजात असंतोष पसरल्याचे आवर्जून नमूद करत मराठा समाजाला न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त केली, तर दुसरीकडे तावडे यांच्या असमाधानकारक उत्तरावर धनंजय मुंडे आणि विक्रम काळे यांनी घोषणा देत सभात्याग केला. (प्रतिनिधी)

दरम्यान, विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांनी या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांना वेळीच धडा शिकवत, योग्य वेळी योग्य चौकशी करा, असे निर्देश दिले. शिवाय मराठा आरक्षणप्रकरणात उमेदवारांना न्याय देण्यासाठी मंगळवारी बैठक घ्या किंवा सभागृहात अर्धा तास चर्चा करा, असेही निर्देश दिले.

Web Title: Resistance of opposition from Maratha Reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.