प्रस्तावित जेट्टीला विरोध
By Admin | Published: September 18, 2016 01:51 AM2016-09-18T01:51:35+5:302016-09-18T01:51:35+5:30
सर्वोदय विद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने शनिवारी पर्यावरण विषयक जनसुनावणी सकाळी 11 वाजता ठेवली होती.
रोहा : इंडो एनर्जी इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीच्या नवीन प्रस्तावित कोर्लई जेट्टी व सानेगाव येथील विस्तारीत जेट्टी संदर्भात सुडकोली येथे सर्वोदय विद्यालयाच्या प्रांगणात महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने शनिवारी पर्यावरण विषयक जनसुनावणी सकाळी 11 वाजता ठेवली होती. सानेगाव व कोर्लई येथील ग्रामस्थांनी जनसुनावणीला विरोध करीत ती उधळून लावली. त्यामुळे जनसुनावणी स्थगित करण्यात आली. यावेळी रोहा प्रांताधिकारी, प्रदूषध मंडळाचे अधिकारी, ग्रामस्थ हजर होते.
इंडो एनर्जी इंटरनॅशनल लि. मार्फत कोळसा प्रकल्प सानेगाव येथे असून याठिकाणी जेट्टी उभारलेली आहे. मात्र या जेट्टीचा विस्तार करण्यात येत आहे. मुरुड तालुक्यातील कोर्लई येथेही कंपनीची नवीन जेट्टी होणार असून शनिवारी सुडकोली गावात महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने ग्रामस्थांची जनसुनावणी ठेवली होती. या सुनावणीला सानेगाव व कोर्लई ग्रामस्थांनी विरोध केला असून ज्या ठिकाणी प्रकल्प होणार आहे, त्या गावात सुनावणी ठेवावी यासाठी ग्रामस्थ आग्रही होते.
कोर्लई येथे होणाऱ्या नवीन जेट्टीमुळे स्थानिकांच्या व्यवसायावर गदा येणार आहे. कोळसा प्रकल्पाने मासेमारी व्यवसायावरही परिणाम होणार आहे. कंपनीने चुकीचा प्रकल्प शासनाकडे सादर केल्याचा आरोप शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी केला आहे. प्रकल्पाने शेताचे नुकसान होईल, त्याचबरोबर ऐतिहासिक कोर्लई किल्ला, अगोरकोट किल्ला या वास्तुंनाही कोळसा प्रदूषणाचा फटका बसण्याची शक्यता असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. मात्र सुडकोलीतील जनसुनावणी वेळी प्रांताधिकारी व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले त्यामुळे या जनसुनावणीला स्थगिती देण्यात आली.