मुस्लिम कुटुंबाला इमारतीत घर देण्यास रहिवाशांचा विरोध
By admin | Published: September 17, 2016 07:38 AM2016-09-17T07:38:29+5:302016-09-17T07:38:29+5:30
हॅप्पी जीवन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत राहणा-या कांताबेन पटेल आणि त्यांचा मुलगा जिग्नेश पटेल यांनी आपला फ्लॅट मुस्लिम व्यापारी खान यांना विकला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
वसई, दि. 17 - हाऊसिंग सोसायटीने मुस्लिम कुटुंबाला घर देण्यास विरोध केला आहे. इमारतीत गुजराती कुटुंबांची संख्या जास्त असून 4 सप्टेंबरला सोसायटीची बैठक पार पडली. या बैठकीत मुस्लिमांना इमारतीपासून दूरच ठेवावे असा ठराव पास करण्यात आला. इमारतीत 16 फ्लॅट असून 11 कुटुंबांनी ठरावावर सही करत निर्णयाला सहमती दर्शवली आहे.
हॅप्पी जीवन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीत राहणा-या कांताबेन पटेल आणि त्यांचा मुलगा जिग्नेश पटेल यांनी आपला फ्लॅट मुस्लिम व्यापारी खान यांना विकला आहे. सोसायटीने 11 सदस्यांनी सही केलेला ठराव कांताबेन पटेल यांना पत्राद्वारे पाठवला असून 'तुम्ही तुमचा फ्लॅट मुस्लिम व्यक्तीला विकण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळाली आहे. तुम्ही असं करु नये असं आम्हाला वाटतं' असं नमूद केलं आहे. तुमचा फ्लॅट दुस-या व्यक्तीला शक्यतो आपल्याच समाजातील व्यक्तीला विका असा सल्लाही देण्यात आला आहे.
पटेल कुटुंबाने हे पत्र हाऊसिंग सोसायटीचे उप-निबंधक आणि पोलीस ठाण्यात पाठवलं असून तक्रार नोंद केली आहे. पटेल यांचा खान यांच्यासोबत करार झाला असून 1 लाख रुपये टोकन म्हणून घेण्यात आले आहेत. खान यांना कर्जासाठी सोसायटीकडून एनओसी मिळणं गरजेचं आहे. 'खान यांनी आम्हाला योग्य रक्कम देण्याचं मान्य केल्यानंतर आम्ही फ्लॅट त्यांना विकण्याचा निर्णय घेतला. मात्र आता सोसायटी एनओसी देण्यास नकार देत आहे,' असं जिग्नेश यांनी सांगितलं आहे.
'हा निर्णय सर्व सदस्यांच्या एकमतानंतरच घेण्यात आला आहे. पटेल जिथे राहतात त्या पहिल्या माळ्यावरील कुटुंबांना इतर धर्मातील लोकांबद्दल काही आक्षेप आहेत. आम्ही यावर मार्ग काढू,' असं सोसायटीचे सेक्रेटरी जितेंद्र जैन यांनी सांगितलं आहे. पहिल्या माळ्यावर पाच फ्लॅट असून सर्व गुजराती कुटुंब राहतात. त्यांनी मांसाहारावर आक्षेप असल्याने विरोध होत असल्याचं कळत आहे. खान यांचा वसईत शोरुम आहे. आपल्याला याअगोदरही अनेकदा अशा नकाराला सामोरं जावं लागल्याच त्यांचं म्हणणं आहे.