मुलींच्या तंत्रनिकेतन कॉलेज बंदला विविध संघटनांचा विरोध

By Admin | Published: December 27, 2016 09:48 PM2016-12-27T21:48:32+5:302016-12-27T21:48:32+5:30

महिला शिक्षणाला चालना मिळावी म्हणून मुलींचे स्वतंत्र शाळा-महाविद्यालये अस्तित्वात आली आहेत

Resistance to various organizations of Polytechnic College closed by girls | मुलींच्या तंत्रनिकेतन कॉलेज बंदला विविध संघटनांचा विरोध

मुलींच्या तंत्रनिकेतन कॉलेज बंदला विविध संघटनांचा विरोध

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

लातूर, दि. 27 - महिला शिक्षणाला चालना मिळावी म्हणून मुलींचे स्वतंत्र शाळा-महाविद्यालये अस्तित्वात आली आहेत. मात्र भाजप सरकारने को-एज्युकेशनच्या नावाखाली लातूरचे महिला तंत्रनिकेतन बंद करण्याचा घाट घातला आहे. त्याला लातुरातील विविध संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला असून, शैक्षणिक बंदचा इशारा दिला आहे. महिला कॉलेज बंद पाडून बेटी कैसे पढेगी असा संतप्त सवाल संघटनांनी केला आहे. 
शिक्षणाची पंढरी म्हणून लातूरची ओळख देशभरात झाली. या शैक्षणिक हबमुळे २५ वर्षांपूर्वी राज्य शासनाने लातूरला शासकीय महिला तंत्रनिकेतन सुरू केले. या आठ वर्षांच्या कालावधीत महिला तंत्रनिकेतनने तंत्रशिक्षणात गुणवत्ता प्रस्थापित केली. मात्र पूरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनला अभियांत्रिकी महाविद्यालयाचा दर्जा देऊन शासनाने महिला तंत्रनिकेतनमध्ये को-एज्युकेशन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतंत्र महिला महाविद्यालयाऐवजी मुला-मुलींच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये महिला तंत्रनिकेतनचे रुपांतर होणार आहे. या शैक्षणिक वर्षापासून को-एज्युकेशन करण्याचा निर्णय शासनाचा आहे. त्याला लातुरातील विद्यार्थ्यांसह विविध संघटनांनी विरोध केला असून, शैक्षणिक बंदचा इशारा दिला आहे. स्वतंत्र महिला तंत्रनिकेतन बंद करून स्त्री शिक्षणाबाबतची उदासिनता असल्याचा आरोप विद्यार्थिनींकडून केला जात आहे. 
प्रथम वर्ष प्रवेशासाठी ४०० जागा शासकीय महिला तंत्रनिकेतनमध्ये होत्या. आता को-एज्युकेशन होत असल्यामुळे त्यात गुणवत्तेने प्रवेश मिळून मुलींच्या प्रवेशाचा टक्का कमी होणार आहे. शिवाय, स्वतंत्र मुलींचे तंत्रनिकेतन असल्यामुळे प्रवेशासाठी पालकांची पहिली पसंती शासकीय तंत्रनिकेतनला असायची. मात्र आता ती सोयच राहणार नसल्याने पालक वर्गातून या निर्णयाचा निषेध व्यक्त केला जात आहे. स्त्री शिक्षणाला चालना देण्याऐवजी महाविद्यालय बंद करून मुलींच्या शिक्षणाची गळचेपी करण्याचाच हा प्रकार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया मुलींनी व्यक्त केल्या.

निर्णय अन्यायकारक... 
महिला तंत्रनिकेतन बंद करण्याचा शासनाचा हा निर्णय अन्यायकारक असून, त्यामुळे ग्रामीण भागातून शिक्षण घेणाऱ्या मुलींवर मोठा अन्याय होणार असल्याची प्रतिक्रिया वैष्णवी पांडे या विद्यार्थिनीने दिली. 
स्त्री शिक्षणाला अडसर... 
जाहिरातबाजीतून ह्यबेटी पढाओह्णची घोषणा शासन करते. तर दुसरीकडे राज्यातील तीन महिला तंत्रनिकेतन बंद करण्याचा निर्णय घेत आहे. हा स्त्री शिक्षणाला विरोध दिसतोय, असे रेणुका नाईक म्हणाली.
आंदोलन उभारणार... 
महिला तंत्रनिकेतन बंद केल्यामुळे मुलींच्या शिक्षणाला मोठा ह्यखोह्ण बसणार आहे. या धोरणामुळे मुलींवर अन्याय होणार आहे. हे तंत्रनिकेतन बंद पडू नये, यासाठी आम्ही आंदोलन उभे करू, असे पल्लवी भुरे हिने सांगितले. 
तंत्रनिकेतन सुरूच ठेवावे... 
शासनाच्या नवीन धोरणानुसार हे तंत्रनिकेतन बंद झाल्यास ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाचा टक्का घटणार आहे. त्यामुळे हे तंत्रनिकेतन सुरू राहणे गरजेचे असल्याचे स्नेहा सोमवंशी म्हणाली.
अडचण होणार...
महिला तंत्रनिकेतन निवासी असल्यामुळे आई-वडील मुलींना मोठ्या प्रमाणात शिक्षणासाठी पाठवीत होते. मात्र आता हे तंत्रनिकेतन मुला-मुलींचे झाल्यामुळे अडचण होणार असल्याचे प्रिया शिंदे म्हणाली.
गरिबांसाठी चांगली सोय... 
तंत्रनिकेतनमधील सर्व शैक्षणिक खर्च शासन करीत आहे. त्यामुळे गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील मुली शिक्षणासाठी पुढे येत आहेत. तंत्रनिकेतन बंद झाल्यास  शिक्षणाचे प्रमाण घटेल, असे सरस्वती जाधव म्हणाली.
चुकीचा निर्णय... 
तंत्रनिकेतनचे को-एज्युकेशनमध्ये रुपांतर करून शासन काय साध्य करणार आहे, माहीत नाही. पण हा निर्णय चुकीचा आहे. त्यासाठी आंदोलन करू, असे अनुजा जाधव हिने सांगितले. 
शासनाचा विरोध करू... 
मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था असलेले हे तंत्रनिकेतन बंद केल्यास विद्यार्थिनींच्या वतीने एकत्रित येऊ. शासनाच्या या धोरणाचा विरोध करू, असे गीतांजली माने म्हणाली.

Web Title: Resistance to various organizations of Polytechnic College closed by girls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.