पियरचे काम पावसाळ्यात संपवण्याचा संकल्प
By admin | Published: March 24, 2017 01:58 AM2017-03-24T01:58:52+5:302017-03-24T01:58:52+5:30
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने पश्चिम उपनगरात हाती घेण्यात आलेल्या मेट्रो ७ या प्रकल्पातील पायलिंग, पाईल कॅप्स आणि पियरचे काम पावसाळ्यात संपवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने पश्चिम उपनगरात हाती घेण्यात आलेल्या मेट्रो ७ या प्रकल्पातील पायलिंग, पाईल कॅप्स आणि पियरचे काम पावसाळ्यात संपवण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
महत्त्वाचे म्हणजे या प्रकल्पाचे काम सुरू असताना वाहतूककोंडी होणार नाही याचीही खबरदारी घेण्यात येत आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे मेट्रो ७ या प्रकल्पाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व असा हा प्रकल्प असून, हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटेल, असा आशावाद प्राधिकरणाने व्यक्त केला आहे.
या पार्श्वभूमीवर मेट्रो ७ चे काम वेगाने हाती घेण्यात आले आहे. एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी गुरुवारी तज्ज्ञांसह मेट्रो ७ च्या सुरू असलेल्या कामाची पाहणी केली असून, दराडे यांनी या वेळी या प्रकल्पातील पायलिंग, पाईल कॅप्स आणि पियरचे काम पावसाळ्यात संपवण्यात येईल, असा संकल्प केला आहे.
सध्या प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामामुळे येथे बॅरिकेड्स लावण्यात आले असून, यामुळे वाहतूककोंडीत भर पडली आहे. परिणामी या कामाचा मुंबईकरांना कमीत कमी त्रास होईल, असे एमएमआरडीएचे म्हणणे आहे. आणि यावर उपाय म्हणून येथील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून, रस्त्यावरील सर्व कामे पूर्ण करण्यात येत आहेत, असेही दराडे
यांनी प्रकल्प भेटीवेळी नमूद केले आहे. (प्रतिनिधी)