संमेलनातील ठराव म्हणजे वादग्रस्त लेखनाचे समर्थन
By admin | Published: February 8, 2017 05:03 AM2017-02-08T05:03:03+5:302017-02-08T05:03:03+5:30
मराठी साहित्य संमेलनात राम गणेश गडकरी यांचा पुतळा हलविण्याच्या कृतीचा निषेध होणे म्हणजे वादग्रस्त,आक्षेपार्ह लेखनाचे मूक समर्थन करण्यासारखे असून
पुणे : मराठी साहित्य संमेलनात राम गणेश गडकरी यांचा पुतळा हलविण्याच्या कृतीचा निषेध होणे म्हणजे वादग्रस्त,आक्षेपार्ह लेखनाचे मूक समर्थन करण्यासारखे असून संभाजी उद्यानात गडकरी यांचा पुतळा बसविल्यास उ द्रेक होईल, असे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
आखरे म्हणाले, ‘जनतेकडून मिळणाऱ्या पैशांमधून संमेलनाला सरकार निधी देत असल्याने संमेलनावर सर्वांचा अधिकार आहे. या संमेलनात सर्व बाजुंनी चर्चा होणे अपेक्षित होते. कोण्या एक विचारसरणी असल्यास ती मोडून काढण्यात येईल.’ ग्रामीण भागातील अनेक साहित्यिक हा ठराव मान्य नसल्याने संमेलनातून मूक निषेध म्हणून निघून गेल्याने तिथे गर्दी नव्हती, असा दावाही त्यांनी केला.
‘राजसंन्यास’ नाटकात गडकरी यांनी खालच्या पातळीवर जाऊन शंभुराजेंची बदनामी केली आहे. चार ग्रंथ लिहिणाऱ्या संभाजी महाराज यांची संमेलनाने उपेक्षा केली. गडकरी यांच्या लिखाणावर खुली चर्चा घडवून आणली गेली पाहिजे. छत्रपतींची बदनामी महत्त्वाची न वाटता गडकरी यांचा पुतळा काढल्याबद्दल जातीयतेपोटी त्यांचे समर्थन करणाऱ्या अमोल पालेकर व इतरांचाही निषेध साहित्यिकांनी केला पाहिजे, अशी मागणी करण्यात आली. (प्रतिनिधी)