विधी परीक्षांचे निकाल लांबणीवर
By admin | Published: May 27, 2017 11:03 PM2017-05-27T23:03:17+5:302017-05-27T23:03:17+5:30
विधी अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन तपासल्या जाणार आहेत. पण, या नवीन पद्धतीचा प्राध्यापकांना त्रास होत असल्याने निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे.
- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विधी अभ्यासक्रमाच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन तपासल्या जाणार आहेत. पण, या नवीन पद्धतीचा प्राध्यापकांना त्रास होत असल्याने निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे.
मुंबई विद्यापीठाने मार्च, एप्रिल महिन्यांत घेतलेल्या सर्व परीक्षांच्या उत्तरपत्रिका आॅनलाइन पद्धतीने तपासणीचे काम सुरू केले आहे. निकाल वेळेत लागावेत यासाठी ही पद्धत अवलंबण्यात येत आहे. पण, हा उद्देश साध्य होईल असे वाटत नाही. कारण विधी अभ्यासक्रमाच्या केटी परीक्षा होऊन दोन महिने उलटले आहेत. अद्याप या परीक्षांचे निकाल जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला असल्याचे मत स्टुण्डट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी मांडले.
केटी परीक्षांचे निकाल आधी लावणे आवश्यक आहे. ते रखडले असताना आता प्राध्यापकांना आॅनलाइन तपासणीचे नवीन प्रशिक्षण दिले जात आहे. सतत आठ तास संगणकासमोर बसून उत्तरपत्रिका तपासणे त्यांना शक्य नाही. त्यामुळे विधीच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे पवार यांनी सांगितले.