सर्व गावांत बॅलेट पेपरचा ठराव करा; शरद पवारांचे आवाहन; ईव्हीएम समर्थक-विरोधक समोरासमोर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 08:55 AM2024-12-09T08:55:28+5:302024-12-09T08:55:46+5:30
इंग्लंड-अमेरिकेत बॅलेट, मग इकडे ‘ईव्हीएम’चा हट्ट का? - शरद पवार
लोकमत न्यूज नेटवर्क
माळशिरस (जि. सोलापूर) : अमेरिका, इंग्लंड येथील मतदान बॅलेट पेपरवर केले जाते. सगळे जग करतेय मग आमचाच हट्ट ईव्हीएमचा का? असा सवाल खासदार शरद पवार यांनी उपस्थित केला. शनिवारी खा. पवार यांनी मारकडवाडी (ता. माळशिरस) येथे भेट दिली. यावेळी आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी पवार म्हणाले, तालुक्याच्या सगळ्या गावांचे ठराव करा. आम्हाला ईव्हीएम मतदान नको, त्या ठरावाची प्रत माझ्याकडे द्या. मुख्यमंत्री म्हणाले की, पवार यांनी हे करणे बरोबर नाही. मी काय चूक केली. या शंकेची माहिती घेऊन निरसन करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे का? आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करू, तुम्ही स्वतः गावाचे म्हणणे ऐका. त्यांच्या म्हणण्यात तथ्य असेल तर त्यांना सहकार्य करा. पोस्टल मत साधारण त्या मतदारसंघाचा ट्रेंड दाखवतात, यानुसार २०१९ची आकडेवारी व २०२४च्या आकडेवारीतील तफावत जयंत पाटील यांनी यावेळी लोकांसमोर मांडली. मतदानाला सरकार का घाबरते, हा शंकेचा विषय आहे, असेही ते म्हणाले.
तक्रारदारांचा आवाज दडपणे ही हुकूमशाही; पृथ्वीराज चव्हाण
सातारा : पारदर्शक निवडणूक हे निवडणूक आयोगाचे कर्तव्य आहे; ईव्हीएमविरोधात तक्रार करणाऱ्या, बॅलेट पेपरसाठी ग्रामसभा घेणाऱ्यांविरोधात तक्रार करणाऱ्यांना न्यायालयाची वा पोलिस यंत्रणेची भीती दाखवणे ही हुकूमशाही आहे,’ असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
अनेक गावांत बॅलेटवर निवडणूक घेण्यासाठी ठराव : पटोले
मुंबई : राज्यातील नव्या सरकारबद्दल जनतेच्या मनात संभ्रम असून हे सरकार आपल्या मताचे नाही ही जनभावना राज्यात तीव्र बनली आहे. मारकडवाडीतच नाही तर राज्यातील प्रत्येक गावाची हीच भावना आहे. बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावे अशी मागणी जनतेतूनच जोर धरत असून ग्रामसभा तसे ठराव पास करत आहेत.
nनिवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय या दोन संस्थांनी या जनभावनेची दखल घ्यावी. विरोधी पक्ष या नात्याने आम्ही सभागृहात व रस्त्यावर लढू, असे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले.
मी राजीनामा देऊ का?
आमदार उत्तम जानकर म्हणाले, मारकडवाडीत मला पडलेल्या मतांचे प्रतिज्ञापत्र करून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतचे ठराव आयोगाकडे सादर करणार आहे. त्यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक करण्याची हमी दिल्यास राजीनामा द्यायला मी तयार आहे.