आयपीसीसी परीक्षेला बसणा-यांना दिलासा
By admin | Published: September 24, 2014 04:56 AM2014-09-24T04:56:36+5:302014-09-24T04:56:36+5:30
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या टीवायच्या प्रमुख परीक्षा ५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठाने जाहीर केला होता
मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या टीवायच्या प्रमुख परीक्षा ५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठाने जाहीर केला होता. याच कालावधीत चार्टड अॅकाउंटंट आणि आयपीसीसीची परीक्षा आल्याने टीवायबीकॉमच्या विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार होते. याची दखल घेत विद्यापीठाने या परीक्षांच्या कालावधीत टीवायबीकॉमची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणूक कार्यक्रमाचा फटका मुंबई विद्यापीठाच्या आॅक्टोबर परीक्षेला बसला होता. त्यामुळे विद्यापीठाने टीवायबीकॉम, बीए आणि बीएससी या परीक्षा ५ नोव्हेंबरपासून घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र याच कालावधीत टीवायबीकॉमच्या काही विद्यार्थ्यांचे पेपर हे आयपीसीसी आणि चॅटर्ड अकाउंटंटच्या परीक्षेच्या एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संम्रभाचे वातावरण निर्माण झाले होते.
मंगळवारी विद्वत परिषदेच्या बैठकीत यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. या परीक्षेच्या दिवशी विद्यापीठाच्या टीवायबीकॉमच्या परीक्षा घेऊ नयेत, अशा सूचना परिषदेने परीक्षा नियंत्रकांना दिल्या आहेत. त्यामुळे आयपीसीसी आणि चार्टड अकाउंटंट परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
टीवायबीकॉमचे सुधारित वेळापत्रक येत्या दोन दिवसांत जाहीर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)