आरक्षणाच्या गोंधळाने निवड यादी लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 09:07 PM2017-07-24T21:07:01+5:302017-07-24T21:07:01+5:30
आयटीआय नियोजित वेळापत्रकानुसार सोमवारीप्रसिध्द केली जाणारी पहिली निवड यादी तीन दिवस लांबणीवर पडली आहे.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 24 - राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची (आयटीआय) नियोजित वेळापत्रकानुसार सोमवारीप्रसिध्द केली जाणारी पहिली निवड यादी तीन दिवस लांबणीवर पडली आहे. यादी तयार करताना विद्यार्थ्यांची आरक्षणनिहाय निवड न झाल्याचे लक्षात आल्याने ऐनवेळी यादी थांबविण्यात आली आहे. त्यामुळे आता दि. २७ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता ही यादी प्रसिध्द केली जाईल, असे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले आहे.
राज्यात आयटीआय प्रवेशासाठी संचालनालयामार्फत ऑनलाईन केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविली जात होती. या प्रक्रियेअंतर्गत सुमारे १ लाख ३२ हजार जागांसाठी तब्बल ३ लाख १२ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज आले आहेत. या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरणे, संस्था व व्यवसायनिहाय पसंतीक्रम देवून अर्ज अंतिम केला आहे. त्यानुसार या विद्यार्थ्यांची पहिल्या प्रवेश फेरीसाठी निवड यादी सोमवारी सायंकाळी पाच वाजता संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाणार होती. मात्र, संचालनालयाकडून कोणतेही कारण न देता ही यादी दि. २७ जुलै रोजी प्रसिध्द होणार असल्याचे संकेतस्थळावर म्हटले आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. निवड यादीनुसार दि. २५ ते २८ जुलै या दरम्यान संबंधित संस्थेत प्रवेश घेण्याची मुदत देण्यात आली होती. आता निवड यादी प्रसिध्द होण्यासच विलंब लागणार असल्याने प्रवेशाचे पुढील वेळापत्रकही कोलमडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
याविषयी बोलताना संचालनालयाचे प्रभारी संचालक अनिल जाधव म्हणाले, यंदा प्रवेश प्रक्रियेसाठी नवीन एजन्सीची नेमणुक करण्यात आली आहे. निवड यादी तयार करताना त्यांच्याकडून आरक्षणाबाबत काही चुका झाल्या आहेत. आरक्षणाच्या प्रमाणानुसार निवड यादी तयार झालेली नाही. यादी तपासली असता त्यामध्ये दोष आढळून आल्याने सोमवारी प्रसिध्द करण्यात आली नाही. एक समिती ही यादी तपासून पुन्हा आरक्षणनिहाय यादी तयार केली जाईल. त्यामुळे यादी लांबणीवर पडली आहे. सर्व चुका दुरूस्त करून दि. २७ जुलैपुर्वीच यादी प्रसिध्द करण्याचा प्रयत्न असेल.