आधी राजीनामे देऊन चौकशीला सामोरे जा - धनंजय मुंडे
By admin | Published: July 30, 2015 05:06 PM2015-07-30T17:06:46+5:302015-07-30T17:17:00+5:30
भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांनी आधी राजीनामे द्यावेत व चौकशीला सामोरे जावे अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - महिला व बालकल्याण खात्यातील २०६ कोटी रुपयांच्या चिक्की व अन्य साहित्य खरेदी प्रक्रियेत सरकारी नियम पायदळी तुडवण्यात आल्याचा घणाघाती आरोप करत भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांनी आधी राजीनामे द्यावेत व चौकशीला सामोरे जावे अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.
गुरुवारी चिक्की प्रकरणावरुन विधान परिषदेत चर्चा झाली. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या खात्यातील अनागोंदी कारभाराचा लेखाजोखाच सभागृहासमोर मांडला. चिक्की खऱेदी प्रक्रियेत घोटाळा असून सत्तेवर आल्यावर फडणवीस सरकार असंवेदनशील झाल्याची टीका त्यांनी केली. सुर्यकांता व कंत्राटदारांसोबत झालेल्या दरकराराचे कागदपत्र सरकारने सादर करावे असे आव्हानच त्यांनी सत्ताधा-यांना दिले.
ज्या कंत्राटदाराचा स्वतःचा उत्पादन प्रकल्प असतो त्यालाच दरकरार दिले जातात याकडे मुंडेंनी लक्ष वेधले. सुर्यकांताने २७ लाख किलो चिक्की बनवली तर त्यांना किती वीज बिल, पाणी बिल आले, त्यांनी गुळ कुठून आणला हेदेखील समोर यायला पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. ताट खरेदी, वॉटर प्यूरिफायर, चटई याच्या खरेदीतही नियमांचे उल्लंघन झाले आहे. या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांकडे २० मेरोजी निवेदन दिले होते. मी या प्रकरणाची कुठेही वाच्यता केली नाही, मग मुख्यमंत्री कार्यालयातून या कागदपत्रांना पाय कसे फुटले याची चौकशी तुम्ही करवून घ्या असे सांगत त्यांनी भाजपामधील अंतर्गत संघर्षही समोर आणला. चिक्कीचा दर्जा चांगला नसल्याचे समोर आले असले तरी संबंधीत खात्याच्या मंत्री व अधिका-यांनी ही चिक्की चांगली असल्याचे दोन अहवाल मॅनेज करुन घेतले असा गंभीर आरोपही त्यांनी केला. लालकृष्ण आडवाणी यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी हवाला घोटाळ्यात नाव येताच राजीना दिला होता, तुम्ही अशा नेत्यांचा वारसा पुढे नेत असाल तर आधी राजीनामे द्या व चौकशीला सामोरे जावे असा टोलाही त्यांनी लगावला.