राज्यातील रिसॉर्ट्सनी केली कोट्यवधींची वीजचोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 06:38 AM2020-02-15T06:38:17+5:302020-02-15T06:39:50+5:30

तपासणी होणार; महावितरणचे अधिकारी सहभागी

Resorts Stealing electricity in huge amount | राज्यातील रिसॉर्ट्सनी केली कोट्यवधींची वीजचोरी

राज्यातील रिसॉर्ट्सनी केली कोट्यवधींची वीजचोरी

Next

यदु जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अनेक रिसॉर्ट्स, अम्युझमेंट पार्क्सनी मल्टिमीटरची शक्कल लढवून गेली आठ ते दहा वर्षे कोट्यवधी रुपयांची वीजबील चोरी केल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे धडक मोहिमेद्वारे तपासणीचे आणि जादाचे मीटर्स तत्काळ रद्द करण्याचे आदेश महावितरणच्या मुंबई मुख्यालयाने दिले आहेत.


नाशिकच्या इगतपुरी उपविभागात बरेच रिसॉर्ट्स आहेत. त्यापैकी ५० टक्क्यांहून अधिक रिसॉर्ट्समध्ये मल्टिमीटरद्वारे ही चोरी झाली आहे. तिथे ५ ते ७ कोटींची वीजबिल चोरी झाल्याचा अंदाज आहे. हे उघड होताच महावितरणच्या दक्षता समितीने नाशिक विभागाचे मुख्य अभियंता, संबंधित अधीक्षक अभियंता व उपविभागीय अभियंता यांची चौकशी केली.


एका रिसॉर्ट मालकाला नियमानुसार एकच वीज मीटर घेता येते. त्यामुळे एका मीटरवर जास्त युनिटचा वापर होऊन वरच्या स्लॅबप्रमाणे व्यावसायिक वापराचे बिल येते. अनेक मीटर लावले तर मात्र, वापर विभागला जाऊन त्यानुसार कमी स्लॅबचे बिल येते.
हेच हेरून रिसॉर्ट मालकांनी अनेक मीटर लावून घेतले. रिसॉर्टमधील प्रत्येक खोलीस एक मीटर लावून घेण्याचा प्रताप काही मालकांनी केला. याआधी २०१७ मध्येही असाच प्रकार समोर आला होता, त्यावेळी महावितरणच्या एका कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आले. पण वीज बिलचोरी बिनबोभाट सुरू राहिली. त्यावरूनच रिसॉर्ट मालक व महावितरणच्या अधिकाऱ्यांमध्ये संगनमत असल्याचा दाट संशय आहे.


राज्यात अन्यत्रही अशीच वीजचोरी होत असल्याचा संशय आहे. रिसॉर्ट्स, अम्युझमेंट पार्क यांच्या रुम्स, जिम, स्पा यासाठी वेगवेगळी मीटर्स घेताना महावितरणच्या नियमांची आणि एमईआरसीच्या निर्देशांची पायमल्ली करण्यात आल्याने तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत. महावितरणच्या मुख्य अभियंत्यांनी शुक्रवारी सर्व अधीक्षक अभियंत्यांना तपासणीच्या आदेशाचे पत्र पाठविले आहे.


नियमबाह्य प्रकार
एकाच व्यावसायिक आवारामध्ये वेगवेगळी मीटर्स देणे हे एमईआरसीच्या दरसूचनेनुसार नियमबाह्य आहे. महावितरणच्या व्यवस्थापनाने या प्रकारांची गंभीर दखल घेतली असून २४ फेब्रुवारीपर्यंत पाहणी करून विस्तृत अहवाल देण्यास सांगितले आहे.

Web Title: Resorts Stealing electricity in huge amount

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.