मोठा भाऊ म्हणून शिवसेनेचा आदर, पण...; जितेंद्र आव्हांडांचा स्पष्ट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 05:29 AM2021-12-10T05:29:30+5:302021-12-10T05:30:10+5:30
राज्यात २०२४ मध्येही महाविकास आघाडीच, शरद पवारांची मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंनाच पसंती
नवी मुंबई : राज्यात २०२४ मध्येही महाविकास आघाडीच सत्तेत येईल, असा दावा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला. मुख्यमंत्री पदासाठी शरद पवार यांची उद्धव ठाकरे यांनाच पसंती आहे आणि पवार यांनी पुणे येथील खासगी चर्चेत हे मत व्यक्त केल्याचेही ते म्हणाले.
महापालिकांच्या निवडणुकीतही महाविकास आघाडी झाली पाहिजे, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची इच्छा आहे. पण, ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे पोटात एक व ओठात एक सुरू आहे. शिवसेना त्यांच्या सोयीप्रमाणे वाॅर्डरचना करीत असल्याचा आरोपही आव्हाड यांनी केला.
नवी मुंबईत ऐरोली येथे बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा झाला. त्यात आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. राज्यात १९९० नंतर कोणत्याही एकाच पक्षाचे सरकार सत्तेवर आलेले नाही. यापुढेही येण्याची शक्यता नाही. त्यामुळे आघाडी अपरिहार्य आहे. मात्र ती करताना सर्वांनी सहकार्य करण्याची गरज असल्यावर त्यांनी भर दिला. राज्यात आघाडी केली जात असताना ठाणे जिल्ह्यात दादागिरी करून वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आघाडी करण्याची भाषा बोलली जाते, परंतु प्रत्यक्षात स्वबळाची तयारी केली जात आहे. नवी मुंबईमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक काँग्रेस अध्यक्षाला खंडणीच्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी नेते दबाव टाकत असल्याची टीकाही त्यांनी शिवसेनेवर केली. आमदार शशिकांत शिंदे, माजी खासदार आनंद परांजपे, जी. एस. पाटील, प्रशांत पाटील, अशोक गावडे आदी उपस्थित होते.
मोठा भाऊ म्हणून शिवसेनेचा आदर; पण...
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने एकत्र लढले पाहिजे. शिवसेना मोठा भाऊ म्हणून त्यांचा जिल्ह्यात आदर करू; पण बोलायचे एक व करायचे एक असे खपवून घेतले जाणार नाही. भाजप आम्हाला फार लांब नाही, असा इशाराही त्यांनी दिला.