बोलीभाषांचा आदर करा!
By admin | Published: April 5, 2016 02:21 AM2016-04-05T02:21:13+5:302016-04-05T02:21:13+5:30
हजारो वर्षांच्या अथक परिश्रमांची फलश्रुती म्हणून भाषा उदयाला आली. बोलीभाषांना योग्य आदर देण्याची हीच योग्य वेळ आहे. संमेलनाच्या निमित्ताने विसंवादाच्या भिंतीतून आशेचे किरण डोकावत
प्रज्ञा केळकर-सिंग ,संतश्रेष्ठ नामदेवनगरी (घुमान)
हजारो वर्षांच्या अथक परिश्रमांची फलश्रुती म्हणून भाषा उदयाला आली. बोलीभाषांना योग्य आदर देण्याची हीच योग्य वेळ आहे. संमेलनाच्या निमित्ताने विसंवादाच्या भिंतीतून आशेचे किरण डोकावत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. बहुभाषिक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने स्वातंत्र्याचे नवे दालन खुले झाले आहे, असा आशावाद पहिल्या बहुभाषिक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी यांनी सरहद संस्थेने आयोजित केलेल्या दोन दिवसीय बहुभाषिक संमेलनाच्या सांगता सोहळ््यात सोमवारी व्यक्त केला.
सुरेखा देवी, साहित्यिक विष्णू सूर्या दास, ज्येष्ठ पत्रकार जतिंदर पन्नू, सरहदचे संजय नहार, भारत देसडला, स्वागताध्यक्ष अरुण नेवासकर, राजन खान आदी मान्यवर उपस्थित होते.
‘संत नामदेव महाराज की जय’च्या जयघोषाने अवघा परिसर दुमदुमून गेला. देवी म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात सर्व राज्यांमध्ये एकात्मता, सांस्कृतिक, सामाजिक ऐक्य नांदत होते. गेल्या काही वर्षांमध्ये हे ऐक्य लोप पावले आहे. गेल्या वीस वर्षांत आपल्याला स्वातंत्र्याच्या मार्गाचा विसर पडला आहे. स्वातंत्र्य आणि स्वत:मध्ये विसंवादाची मोठी भिंत उभी राहिली आहे. दोन प्रातांमध्ये संवाद, संस्कृतींची ओळखच उरलेली नाही. आपल्याला एकमेकांची साहित्यिक वैशिष्ट्ये माहीत नाहीत, ही मोठी दु:खद बाब आहे. विसंवादाच्या भिंती उभ्या राहिल्याने देशाचे मोठे नुकसान झाले आहे. बहुभाषिक साहित्य संमेलनाच्या निमित्ताने या भिंतीमध्ये संवादाची खिडकी दिसू लागली आहे. स्वातंत्र्य पुन्हा एकदा टप्प्यात आलेले असताना ते मिळवण्यासाठी धाडसाने पावले उचलायला हवीत. मानवतेचा आणि भाषिक ऐक्याचा वारसा जपायला हवा. भाषांची सरहद तोडून संस्कृती समृद्ध करायला हव्यात.
नि. ना. रेळकर यांच्या ‘संत नामदेव विहंग दर्शन’, सिमरत सुमेरा यांच्या ‘पुखराज’ आणि राजवंद राज यांच्या ‘रागनिया’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले.