स्वत:च्या मताचा आदर करा

By admin | Published: February 19, 2017 02:59 AM2017-02-19T02:59:14+5:302017-02-19T02:59:14+5:30

एखाद्या कंपनीच्या मालकानेच सेवक नियुक्ती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार केला किंवा गहाळ राहिला तर सेवक मुजोर होतील, मालकाचे ऐकणार नाहीत आणि ती कंपनी रसातळाला

Respect your own opinion | स्वत:च्या मताचा आदर करा

स्वत:च्या मताचा आदर करा

Next

- विजय कुंभार

एखाद्या कंपनीच्या मालकानेच सेवक नियुक्ती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार केला किंवा गहाळ राहिला तर सेवक मुजोर होतील, मालकाचे ऐकणार नाहीत आणि ती कंपनी रसातळाला जाईल यात शंकाच नाही. तसेच काहीसे घडले आहे आपल्या देशाबद्दल. आपल्या देशातील नागरिकांनी लोकशाही स्वीकारली तेव्हाच देशातील प्रत्येक माणूस त्याचा मालक झाला. लोकशाही म्हणजे ‘लोकांनी, लोकांच्या हिताकरिता, लोकांकरवी चालविलेले राज्य!’ हे जवळपास देशातील प्रत्येकाला तोंडपाठ असेल. परंतु लोक म्हणजे आपण आणि आपण या देशाचे राजे आहोत असे खरेच किती जणांना वाटते? कदाचित शतकानुशतके राजेशाही किंवा हुकूमशाहीची सवय लागली असल्याने असा ‘देशाचा मालकी हक्क’ अनेकांच्या पचनी पडला नसावा. त्याचमुळे ही ‘मालक’ किंवा ‘राजे’मंडळी प्रत्येक निवडणुकीत सेवकांकडेच आपला मालकीहक्क सोपवून मोकळे होत असावेत.
हा देश चालविण्यासाठी संसद, विधान मंडळ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती करण्यात आली आहे. सोयीसाठी आपण त्यांना कंपन्या म्हणू. या कंपन्यांसाठी सेवक निवडीची जी प्रक्रिया राबवली जाते तिला ‘निवडणूक’ म्हणतात. निवडणुकीमध्ये आपल्या वतीने हा देश चालविण्यासाठी आपले ‘सेवकङ्क्तप्रतिनिधी’ निवडण्यासाठी नागरिकांनी मतदान करायचे असते. परंतु बऱ्याचदा ही ‘मालक’ किंवा ‘राजे’मंडळी मतदान करीत नाहीत किंवा कोणत्यातरी संभाव्य सेवकाला आपले मत विकून मोकळे होतात. परिणामी, निवड झाल्यानंतर सेवक मुजोर होतात, मनमानी करतात आणि मालकांचे ऐकेनासे होतात.
प्रत्येक निवडणुकीत बहुतांश मालकांनी म्हणजे मतदारांनी आपल्या निष्क्रियतेने किंवा भ्रष्टाचाराने सेवकांना जाब विचारण्याचा हक्क गमावलेला असतो. प्रत्येक मतदाराने नेहमी स्वत:ला आपल्या मताची किंमत समजली आहे का आणि स्वत:तरी आपल्या मताचा आदर करतो का हे पाहिले पाहिजे. मताचा आदर करणे म्हणजे मतदान करणे. परंतु मतदानाच्या दिवशी ते न करता सुटी एन्जॉय करणारे, मत विकणारे आपल्या मताचा अनादर करीत असतात. जे लोक स्वत:च्या मताचा आदर करीत नाहीत त्यांच्या मताचा आदर ‘इतरांनी’ तरी का करावा? त्यामुळेच ‘सेवक’ एकदा निवडून आले की जनतेच्या मताला किंमत देत नाहीत आणि मतदारांचे मालक होतात.
आपल्या मताचा आदर करून स्वच्छ मनाने आणि निर्भीडपणे मतदान केले तर आपण निवडून दिलेल्या सेवकाला मालक या नात्याने जाब विचारण्याचा अधिकार आपल्याला राहील. लाचार होऊन लोभापोटी मतदान केले तर आपण गुलामगिरी स्वीकारून स्वत:साठी मालक निवडतोय असा त्याचा अर्थ होईल आणि गुलामांना कोणतेही हक्क नसतात. मतदान न करणारे किंवा मत विकणारी मंडळी आपल्या कृत्याने भ्रष्ट व नालायक सेवकाची निवड होण्यास मदत करीत असतात आणि स्वत:वरच नव्हे, तर प्रामाणिकपणे मतदान करणाऱ्यांवरही जबरदस्तीने गुलामगिरी लादत असतात. म्हणूनच गुलामगिरी नको असेल तर मतदान केले पाहिजे.

(लेखक हे ज्येष्ठ माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत.)

Web Title: Respect your own opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.