लोकशाहीचा आदर करणारा समाज निर्माण केला पाहिजे
By Admin | Published: April 5, 2017 04:01 AM2017-04-05T04:01:09+5:302017-04-05T04:01:09+5:30
लोकशाही टिकवायची असेल तर भारतीय घटना मानणारा आणि तिचा आदर करणारा समाज निर्माण केला पाहिजे
डोंबिवली : लोकशाही टिकवायची असेल तर भारतीय घटना मानणारा आणि तिचा आदर करणारा समाज निर्माण केला पाहिजे, असे मत ज्येष्ठ पत्रकार महेश म्हात्रे यांनी व्यक्त केले.
कल्याण-डोंबिवली महापालिका व बहुजन कर्मचारी परिवर्तन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आचार्य अत्रे रंगमंदिरात ‘मागोवा आंबडेकरी चळवळीचा’ हा कार्यक्रम रविवारी झाला.
आंबडेकरी चळवळीचा साहित्यासाठीचा आधारस्तंभ पुरस्कार प्रा. शुक्राचार्य गायकवाड, समाजसेवक पुरस्कार दीपश्री माने-बलखंडे, कलावंताचा पुरस्कार ललिता गोडबोले, प्रशासकीय अधिकारी पुरस्कार लहू वाघमारे, महिला कार्यकर्ता पुरस्कार भारती जाधव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार किरण सोनवणे यांना दलित मित्र अण्णासाहेब रोकडे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप रोख पाच हजार रुपये आहे. मात्र, ही रक्कम त्यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांकरता संस्थेकडे सुपूर्द केली.
पत्रकारिता पुरस्काराच्या मानकऱ्यांमध्ये ‘लोकमत’चे प्रतिनिधी आकाश गायकवाड आणि मुरलीधर भवार यांचाही समावेश आहे. आंबडेकरी चळवळीचा पत्रकार आधारस्तंभ पुरस्कार संजय कोचरेकर यांना प्रदान करण्यात आला.
म्हात्रे म्हणाले, की लोकशाही निर्माण होण्यासाठी भारतरत्न डॉ. आंबडेकर, महात्मा गांधी, पं, जवाहरलाल नेहरू अशा थोर नेत्यांचे फार मोठे योगदान आहे, याची आजच्या तरुणांनी जाणीव ठेवली पाहिजे, असे ही त्यांनी सांगितले.
या वेळी महापौर राजेंद्र देवळेकर, आमदार नरेंद्र पवार, ज्येष्ठ आंबडेकरी नेते अण्णा रोकडे, गटनेते रमेश जाधव, गायक प्रतापसिंग बोदडे, राजरत्न आंबडेकर, निवृत्त सहसचिव आय. एम. मोरे, उपायुक्त दीपक पाटील आदी उपस्थित होते.
पुरस्कार निवडीसाठी प्रा. विठ्ठल शिंदे, आय. एम. मोरे, भरत खरे, राजेश शिर्के, संगीता गायकवाड, शांताराम निकम, भिमराव सावंत आणि संस्थेचे उपाध्यक्ष विलास गायकवाड यांनी काम पाहिले.
दरम्यान, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप जगताप, विजय सरकटे यांनी केले. ज्येष्ठ कवी प्रतापसिंग बोदडे यांनी शाहीरातून आंबडेकरी चळवळ मांडली. (प्रतिनिधी)
>तरुणांनी चळवळीत सहभागी व्हावे
डॉ. बाबासाहेब यांचे पणतू राजरत्न आंबडेकर यांनीही पुढील चळवळीची दिशा आणि आपली अवस्था, यावर विचार मांडले. तरुणांना त्यांनी या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले.