मराठी सारस्वताच्या दरबारातील एक मानाचे पान विजया राजाध्यक्ष
By admin | Published: March 8, 2017 07:25 PM2017-03-08T19:25:42+5:302017-03-08T19:25:42+5:30
यंदाच्या जनस्थान पुरस्काराच्या मानकरी. या निमित्ताने त्यांची साहित्य क्षेत्रातील उंची नव्याने अधोरेखित झाली. विजया राजाध्यक्ष हे मराठी सारस्वताच्या दरबारातील
यंदाच्या जनस्थान पुरस्काराच्या मानकरी. या निमित्ताने त्यांची साहित्य क्षेत्रातील उंची नव्याने अधोरेखित झाली. विजया राजाध्यक्ष हे मराठी सारस्वताच्या दरबारातील एक मानाचे पान. मराठी स्त्री लेखनात, कथा लेखनात जो धैर्याचा बाज आहे, तो विजयाबाईंच्या लेखणीतून उतरलेल्या शब्दांमधून सातत्याने जाणवतो. भाषा- विचार आणि भाषा-व्यवहार या बाबतीत संवेदनशील असलेल्या विजयाबाई मराठी भाषा जगण्याविषयी कमालीच्या सजग आणि आग्रही आहेत.
मराठीकडे मातृभाषा म्हणून पाहतानाचा त्यांचा दृष्टिकोन मराठी जगविण्यास उपयुक्त आहे. शाळा हा जीवनाचा पाया आहे. त्या पायापाशीच मराठी शिक्षणाचा नीट संस्कार व्हायला हवा, हे त्यांचे केवळ मत नव्हे, तर ती त्यांची धारणा आहे. चौफेर आणि विपुल लेखन केले असले, तरी विजयाबाईंचा वैचारिक गाभा हा समीक्षकाच्या जातकुळीतला आहे. विद्यार्थी दशेतच त्यांनी लेखनाला सुरुवात केली. त्यांची पहिली कथा स्त्री मासिकात प्रसिद्ध झाली. साहित्याविषयी ओढ असलेल्या विजयाबाईंना त्याला पोषक असा शिक्षकी पेशाच निवडला. उभी हयात त्यांनी अध्यापन केले. एसएनडीटी आणि एलफिन्स्टन महाविद्यालयात त्यांनी मराठीचे अनेक उत्तमोत्तम विद्यार्थी घडविले.
विजयाबाईंच्या साहित्याचा आकृतिबंध कथेचा असला, तरी त्याचा सोलीव गाभा कथेकरी नव्हे, तर वैचारिक राहिला. हे त्यांचे वैशिष्ट्य कायम राहिले. त्यांच्या समीक्षा लेखनातील धैर्याचा भाग त्याचेच प्रत्यंतर देतो. त्यांची समीक्षा शोधक वृत्तीची राहिली. त्यामुळेच कथांमधील स्त्री चित्रण वरपांगी मध्यमवर्गीय वाटलं तरी त्यातून वेगळा विचार सतत डोकावत राहिला. विचारवंतांच्या नसण्याची पोकळी विजयाबाईंच्या सऱ्हदय वैचारिक लेखणीने कायमच भरून काढली. जवळपास वीस-एक कथासंग्रहांमधून मराठी साहित्यात मोलाची भर टाकणाऱ्या विजयाबाई २००० साली इंदूरला झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी होत्या.