म्हाडाच्या लोकसेवा सुविधा केंद्रांना प्रतिसाद
By admin | Published: October 4, 2015 02:39 AM2015-10-04T02:39:18+5:302015-10-04T02:39:18+5:30
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश जारी झाल्यानंतर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) सर्वांत प्रथम पुढाकार घेत या कायद्याची अंमलबजावणी सुरू केली होती.
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश जारी झाल्यानंतर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) सर्वांत प्रथम पुढाकार घेत या कायद्याची अंमलबजावणी सुरू केली होती. म्हाडाने सर्व मंडळामध्ये सुरू केलेल्या लोकसेवा सुविधा केंद्रांना नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. म्हाडाच्या सर्व विभागीय मंडळांमध्ये सुमारे दीड महिन्यात विविध कामांसाठी २४८८ अर्ज प्राप्त झाले.
त्यापैकी १ हजार ३३0 अर्ज निकाली काढण्यात म्हाडाला यश आले असल्याने लोकसेवा कायद्याच्या अंमलबजावणीत म्हाडाने आघाडी घेतली आहे. लोकसेवा हमी कायदा २0१५च्या अंमलबजावणीस म्हाडाने १३ आॅगस्टपासून प्रारंभ केला. गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्या हस्ते सुविधा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या कायद्यांतर्गत म्हाडाने
१० सुविधा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. या सेवा आॅनलाइन पद्धतीने नागरिकांना मिळाव्यात यासाठी प्रोबिटी सॉफ्टवेअरच्या मदतीने म्हाडामध्ये अद्ययावत संगणकीय प्रणाली तयार करण्यात आली आहे.
लोकसेवा सुविधेअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे एकूण १२0७ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ६0४ अर्ज निकाली काढण्यात आले आहेत; तर आर आर मंडळाकडे १४५ अर्जांपैकी ३१ अर्ज निकाली काढले आहेत. कोकण मंडळाकडे १५७ अर्जांपैकी ७३ अर्ज निकाली काढले आहेत, तर नागपूर मंडळाकडे २८४ अर्जांपैकी १९७ अर्ज निकाली काढले आहेत. एकूण प्राप्त अर्जांपैकी ११४ अर्ज नाकारण्यात आले असून, ५१७ अर्ज निकाली काढण्याचे काम म्हाडामार्फत सुरू आहे.