मोर्चाला प्रतिसाद हा मराठ्यांना गृहित धरल्याचा उद्वेग - डॉ.जयसिंगराव पवार यांचे मत

By admin | Published: October 4, 2016 06:30 PM2016-10-04T18:30:12+5:302016-10-04T18:30:12+5:30

मराठा समाजातील बहुतेक जण हे शेतकरी आहेत. म्हणजे एकीकडे हा मराठा सर्व समाजाची अन्नधान्याची गरज पूर्ण करतो; तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या सीमेवर शत्रूपासून

The response of the Marathas to the Marathas - The view of Dr. Jaysinghwar Pawar | मोर्चाला प्रतिसाद हा मराठ्यांना गृहित धरल्याचा उद्वेग - डॉ.जयसिंगराव पवार यांचे मत

मोर्चाला प्रतिसाद हा मराठ्यांना गृहित धरल्याचा उद्वेग - डॉ.जयसिंगराव पवार यांचे मत

Next

- समीर देशपांडे / ऑनलाइन लोकमत

कोल्हापूर, दि. 04 -  मराठा समाजातील बहुतेक जण हे शेतकरी आहेत. म्हणजे एकीकडे हा मराठा सर्व समाजाची अन्नधान्याची गरज पूर्ण करतो; तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या सीमेवर शत्रूपासून तुमचे-आमचे संरक्षण करतो. म्हणजेच एकीकडे आमचे पोट भरणारा आणि दुसरीकडे आमचे संरक्षणही करणारा असा हा मराठा बदलत्या परिस्थितीत चोहोबाजूंनी पिचला आहे. आतापर्यंत अनेक वर्षे मराठ्यांना सर्व पक्षांनी गृहीत धरल्याचा हा परिणाम असल्याचे मत ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.
मराठा समाजाच्या बदलत्या परिस्थितीचे विश्लेषण करताना डॉ. पवार म्हणाले, गेल्या ३० वर्षांत सर्वसामान्य मराठा वेगवेगळ्या पद्धतींनी अडचणीत येत गेला. प्रगती झाली नाही का? तर झाली. मात्र शहरी नागरिकांमध्ये मराठ्यांची जी प्रतिमा आहे, तसा मराठा खेड्यांमध्ये सध्या नाही. मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषदेचा सदस्य, सभापती, साखर कारखानदार अशी अनेक सत्तास्थाने मराठ्यांकडे आहेत. मात्र हेच सर्वजण म्हणजे मराठा समाज असे होत नाही. यांच्याही पलीकडे फार मोठा मराठा समाज, जो केवळ आणि केवळ शेतीवर अवलंबून आहे, त्याची अवस्था बिकट आहे.
मराठा समाज सर्व पक्षांत विभागला गेला आणि सर्वच पक्षांनी मराठ्यांना गृहीत धरले. ह्यमराठा म्हणजे बागायतदारह्ण असे चित्र पुढे आले. शेकडो टन ऊस घालणारा, चारचाकी गाड्या फिरविणारा मराठा शेतकरी तुलनेत संख्येने कमी आहे. मात्र, दुसरीकडे जिरायतदार शेतकऱ्यांचे बुडीतचे अर्थशास्त्र कुणी पाहतच नाही. अल्पभूधारक मराठा शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे. एकीकडे कमी होत जाणारी शेती, दुसरीकडे शेती असूनही त्याला पाण्याची उपलब्धता नाही; तिसरीकडे त्याने पिकविलेल्या मालाला हमीभाव नाही, कर्जे काढून शिकविलेल्या मुलाला किंवा मुलीला पाहिजे तेथे प्रवेश मिळेल याची खात्री नाही. प्रवेश मिळालाच आणि तो किंवा ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला किंवा झालीच तर नोकरीची हमी नाही, अशी नकारात्मकतेची मालिकाच सर्वसामान्य मराठ्यांच्या आयुष्यात गेली अनेक वर्षे सुरू आहे. आमच्या आधीच्या किंबहुना आमच्याही पिढीने हे सर्व सहन केले. मात्र आताची पिढी हे सहन करायला तयार नाही. यातूच राज्यभर हे मोर्चे निघत आहेत.
राज्यातील जे शेतकरी आत्महत्या करीत आहेत, यात बहुतांश मराठा शेतकरीच आहेत. आपला प्यारा जीवही नकोसा वाटावा इतकी विपरीत परिस्थिती मराठा शेतकऱ्यांवर आली असेल तर मग याचा उद्रेक हा होणारच. म्हणजेच सर्वसामान्य मराठा समाजाच्या आर्थिक परिस्थितीमध्ये सगळं दुखणं लपलं आहे. म्हणूनच केवळ मलमपट्टी न करता हे दुखणं मुळापासूनच बरं करण्यासाठीची तातडीची पावलं आता उचलली गेली पाहिजेत.

राजकीय इच्छाशक्ती हवी
मराठ्यांची स्थिती काय आहे, याची सर्वांना जाणीव आहे. आपल्यावर वर्षानुवर्षे झालेल्या अन्यायामुळे तो आता पेटून उठला आहे. विशेषत: तरुण आणि तरुणी अधिक पेटून उठल्या आहेत; कारण प्रवेशापासून नोकरीपर्यंत सर्वत्र ते भरडले जात आहेत. त्यामुळे नेत्यांना बाजूला ठेवून त्यांनी ही चळवळ हाती घेतली आणि तिथे आता एवढे विशाल रूप धारण केले आहे की, नेत्यांनाच सहभागी होण्याची आता वेळ आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता शासनाने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. त्यासाठी केवळ आणि केवळ राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. ती असल्यास तमिळनाडूप्रमाणे महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी काही अडचण असेल, असे मला वाटत नाही.

पुढची पायरी उचलायला लावू नका
मराठा समाज हा आतापर्यंत झोपलेल्या ड्रॅगनप्रमाणे होता. तो आता कुठे डोळे चोळत उठायला लागला आहे. तर असे लाखालाखांचे मोर्चे महाराष्ट्रात निघायला लागले आहेत. आत्ताच या सर्व युवाशक्तीला विधायक वळण देण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक ती पावले सरकारने उचलावीत. पारंपरिक समित्या आणि गट स्थापन न करता थेट निर्णय घ्यावा. मात्र तसे न झाल्यास ही मराठा युवाशक्ती पुढची पायरी उचलेल, असे मला वाटते. मात्र शासनाने तिला तशी पायरी उचलायला लावू नये.

Web Title: The response of the Marathas to the Marathas - The view of Dr. Jaysinghwar Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.