भुजबळांच्या खांद्यावर बिहारची जबाबदारी
By admin | Published: June 10, 2015 03:16 AM2015-06-10T03:16:13+5:302015-06-10T03:16:13+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसने भ्रष्टाचारामुळे गोत्या आलेल्या छगन भुजबळांची पाठराखण करीत त्यांच्या खांद्यावर बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे.
पाटणा : राज्य मध्यवर्ती ग्रंथालय इमारत बांधकाम कंत्राटात भ्रष्टाचार केल्यावरून माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी गुन्हा दाखल केला असला, तरी राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र भुजबळांची पाठराखण करीत त्यांच्या खांद्यावर बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची दोन दिवशीय बैठक पाटणा येथे सुरू आहे. एसीबीने गुन्हा दाखल केल्यामुळे पुन्हा चर्चेत आलेले भुजबळ मंगळवारी पाटण्याला रवाना झाले. बिहार निवडणुकीत राष्ट्रवादी आपले उमेदवार उतरविणार असून भुजबळ मोठी जबाबदारी उचलतील असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी जाहीर केले.
यापूर्वी भुजबळ यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री असताना बिहारमध्ये महात्मा फुले समता परिषदेतर्फे ओबीसींचा मेळावा घेतला होता. भुजबळ यांची काही महिन्यांपूर्वी पक्षात कोंडी सुरू होती तेव्हा त्यांनी देशभरातील वेगवेगळ््या राज्यांत ओबीसींचे मेळावे घेतले होते.
बिहारमधील निवडणुकीबाबत नितीशकुमार व लालुप्रसाद यादव यांच्यासोबत आपली चर्चा झाली असल्याचे पवार यांनी सांगितले. जागावाटपाबाबत चर्चा करताना जेथे राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत आहे तेथील जागा मागण्यात येतील, असे पवार म्हणाले. राष्ट्रवादीचे तारीक अन्वर हे बिहारमधील खासदार आहेत. बिहार निवडणुकांचे निकाल हे देशाच्या राजकारणाला वेगळी दिशा देतील, असे भाकित पवार यांनी वर्तविले. (विशेष प्रतिनिधी)
...............................................
मुख्यमंत्री-भुजबळ भेटीची चर्चा
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल्यानंतर छगन भुजबळ यांनी मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे समजते. मात्र या भेटीचा तपशील मिळू शकला नाही. आपण पक्षाच्या बैठकीकरिता बिहारला असल्याचे भुजबळ यांनी सांगत अधिक भाष्य करण्यास नकार दिला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करुनही ते उपलब्ध झाले नाहीत. तेलगी प्रकरणाच्यावेळी भाजपाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी भुजबळ यांना लक्ष्य केल्यावर त्यांनी गडकरी यांचीही भेट घेतली होती.
---------------
अच्छे दिन कुठे दिसले नाहीत
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला, पण आपल्याला कुठेही अच्छे दिन दिसले नाहीत, असा टोला पवारांनी मोदींना लगावला. बांगलादेशाची निर्मिती इंदिरा गांधींनी केली तेव्हा भाजपा नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांचे कौतुक केले होते, असे सांगत बांगलादेश निर्मितीचे श्रेय भाजपाने लाटू नये, असेही पवार म्हणाले.