विश्रामगृह धूळ खात पडून

By admin | Published: July 23, 2016 01:41 AM2016-07-23T01:41:12+5:302016-07-23T01:41:12+5:30

नूतनीकरण होऊ न शकल्याने मागील दहा ते बारा वर्षांपासून हे विश्रामगृह धूळ खात पडले आहे.

The rest house fell into the dust | विश्रामगृह धूळ खात पडून

विश्रामगृह धूळ खात पडून

Next

सिंहगड रस्ता : राज्यभरातील पर्यटकांचा राबता असलेल्या किल्ले सिंहगडावरील पर्यटन महामंडळाच्या विश्रामगृहावर आतापर्यंत लाखो रुपये खर्च करूनही पूर्णपणे नूतनीकरण होऊ न शकल्याने मागील दहा ते बारा वर्षांपासून हे विश्रामगृह धूळ खात पडले आहे.
सिंहगडावर दररोज हजारो पर्यटक येत असतात. पुणे शहर व जिल्ह्यातील पर्यटकांचे बरोबरच राज्याचे कानाकोपऱ्यातूनही येथे पर्यटक येतात. अलीकडच्या काळात तर देशाच्या कानाकोपऱ्यातील तसेच परदेशातील पर्यटकांची पावलेही गडाकडे वळू लागली आहेत. गडावर येणाऱ्या पर्यटकांच्या सोई-सुविधांसाठी राज्य पर्यटन खाते व राज्य पुरातत्त्व विभागाच्या वतीने काही नवीन विकासकामे हाती घेतली गेली असून ध्यानधारणा केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आहे. चार-पाच वर्षांपूर्वी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक कठडे व चालण्यासाठी पदपथही बनविण्यात आल्याने या गडाचे रूप पालटू लागले आहे.
पर्यटन महामंडळाच्या पुणे विभागाच्या व्यवस्थापिका वैशाली चव्हाण यांच्या पुढाकाराने पर्यटन महामंडळाने स्वच्छ भारत अभियान योजनेअंतर्गत सिंहगडची निवड केल्याने येथे साफसफाईच्या बाबतीत काही चांगले बदलही घडू लागले आहेत. मात्र काही अत्यावश्यक बाबींकडे मात्र राज्य सरकार, सरकारचे पर्यटन खाते व पुरातत्त्वचे दुर्लक्ष असून येथे येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी असलेले विश्रामगृह गेल्या दहा ते बारा वर्षांपासून धूळ खात पडलेले आहे.
या गडावर वारंवार उच्चपदस्थ अधिकारी, लोकप्रतिनिधी व व्ही. आय. पींची ये-जा असते. मात्र हे लोक विश्रामगृहापासून अनभिज्ञच असतात. (वार्ताहर)
>मध्यंतरी सहा-सात वर्षांपूर्वी त्या वेळच्या सत्तेतील एका बड्या असामीच्या हितसंबंधीला हे विश्रामगृह चालविण्याचा ठेका देण्यासाठी हालचाली सुरू
होत्या. नूतनीकरणासाठी सुमारे ७५ ते ८० लाख रुपये निधीही मंजूर झाला होता. मात्र संबंधितांना यात मनासारखा न्याय मिळून न शकल्याने विश्रामगृह नूतनीकरणाबरोबरच या विश्रामगृहाचा पर्यटन विभागास पूर्णपणे विसरच पडला आहे.
>विश्रामगृह की
बंद हवेली?
विश्रामगृहाच्या छतावर केवळ पत्रा टाकून बाहेरून आकर्षक संरक्षक भिंत व केवळ दिमाखदार दरवाजा केला आहे. असे असले तरी या विश्रामगृहाच्या आतील बाजूचे चित्र मात्र फारच विदारक आहे. आतील बांधकामाच्या जीर्ण झालेल्या भिंती, दरवाजांची झालेली दुरवस्था तसेच गळतीमुळे छप्पर, भिंती व आतील हॉल व इतर कक्षांची अवस्था तर पाहावतच नाही. हॉलच्या खिडक्यांना ना तावदाने आहेत ना सुस्थितीत लोखंडी ग्रील. त्यामुळे हे विश्रामगृह आहे की पडकी हवेली हेच समजत नाही. या विश्रामगृहात साधे डोकावले तरी एखाद्या शेकडो वर्षांपूर्वी बंद हवेलीचे दृष्य डोळ्यांसमोर येते.

Web Title: The rest house fell into the dust

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.