वारकऱ्यांसाठी विसावा

By Admin | Published: June 9, 2016 02:09 AM2016-06-09T02:09:23+5:302016-06-09T02:09:23+5:30

महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव असणाऱ्या आषाढी वारीचा सोहळा तीन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे

Rest for the Warkaris | वारकऱ्यांसाठी विसावा

वारकऱ्यांसाठी विसावा

googlenewsNext


पिंपरी : महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव असणाऱ्या आषाढी वारीचा सोहळा तीन आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून जाणाऱ्या देहू- आळंदी रस्त्यावर वारकऱ्यांसाठी विसावा तयार केला आहे. त्यास तुळशी वृंदावन असे नाव देण्यात आले आहे.
भागवत धर्मातील वारकरी संप्रदायाचा आषाढी वारीचा सोहळा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक बनू लागला आहे. विश्वकल्याणाचे दान मागणाऱ्या या सोहळ्याची लौकिकता वाढतच आहे. आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ कैवल्यसाम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वरमहाराज, जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराममहाराज या संतांच्या पालख्या पंढरपूरला जात असतात. तर दर महिन्याला वारीसाठी देहू-आळंदीत मोठ्या प्रमाणावर वारकरी येत असतात. या सोहळ्यात मोठ्या प्रमाणावर भाविक सहभागी होत असतात. वारकरी देहूतील संतश्रेष्ठ तुकोबाराय आणि आळंदीतील ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेऊन घरी परतत असतात. अशा वारकऱ्यांना विसाव्यासाठी आजवर कोणतीही सोय नव्हती. म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेने सीएसआरमधून बीआरटी मार्गावर तुळशी वृदांवन विसावा निर्माण करण्याचे ठरले. ही संकल्पना तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांची होती. (प्रतिनिधी)
... असा आहे विसावा
विसाव्याच्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी आसन व्यवस्था किमान पंचवीस लोक एकाच वेळी बसू शकतात. या ठिकाणी वारकऱ्यांना भजन करण्यासाठी जागा तयार केली आहे. छोटी छोटी झाडे, तसेच हिरवळीने वृंदावनाचा परिसर सुशोभित केला आहे. चार बाय ग्रेनाइटवर संत ज्ञानेश्वरमहाराज, संत तुकाराममहाराज यांची वचने आणि छायाचित्रे असणार आहेत. ‘दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो...’ अशी संतवचने या ठिकाणी लावण्यात आली आहेत. या ठिकाणी विजेची बचत व्हावी म्हणून एलईडी दिवे बसविलेले आहेत.
पाच ठिकाणी उभारणार वृंदावन
देहू-आळंदी रस्त्यावर पाच ठिकाणी तुळशी वृदांवन विसावे उभारले जाणार आहेत. डुडुळगाव येथे राजमाता जिजाऊ फार्मसी महाविद्यालयासमोर, मोशी चौक, हवालदारवस्ती मोशी, राजकमल विहार सोसायटी, बोराटेवस्ती असे विसावे उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी बोराटेवस्ती येथील विसाव्याचे काम पूर्ण झाले आहे.
देहू-आळंदी रस्त्यावर वारकऱ्यांना विसाव्यासाठी सोय नव्हती. आषाढी वारी किंवा महिन्याची वारी करण्यासाठी वारकरी या रस्त्याने जात असतात. काही छोट्या दिंड्याही या मार्गावरून जात असतात. वारकऱ्यांना विसाव्याची सोय नव्हती. या मार्गावर विसावा निर्माण करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. यासाठी महापालिकेचा कोणताही निधी खर्च केला जाणार नाही. यासाठी गृहनिर्माण संस्था, शाळा, महाविद्यालये, सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्यास ठिकठिकाणी विसावे उभारता येणार आहेत.-विजय भोजणे
अभियंता, बीआरटीएस

Web Title: Rest for the Warkaris

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.