भाजपाला मतदान करणारे १८ नगरसेवक राष्ट्रवादीतून बडतर्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 05:57 AM2019-01-13T05:57:42+5:302019-01-13T05:57:47+5:30
शहराध्यक्ष विधाते यांनाही पक्षाने हटविले
मुंबई : अहमदनगरच्या महापौर निवडणुकीत पक्षादेश डावलून भाजपाला मतदान केल्याबद्दल राष्ट्रवादीच्या १८ नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. पक्षाचे शहर अध्यक्ष माणिकराव विधाते यांनाही पदावरुन हटविण्यात आले, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी दिली.
या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जातीयवादी पक्षांना पाठिंबा देऊ नये, असा स्पष्ट आदेश असताना तो डावलण्यात आला.
त्यानंतर पक्षाच्या वतीने त्यांना सात दिवसांत म्हणणे मांडण्याची संधी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी नोटिसीद्वारे दिली होती. परंतु यावर कोणताही खुलासा करण्यात आला नसल्याने पक्षाच्या वतीने कारवाई करण्यात आली. विधाते यांनी पक्षविरोधी कारवाई होत असताना पक्षश्रेष्ठींना कल्पना दिली नाही किंवा या घटनेबाबत खुलासा केला नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
या निर्णयामुळे अहमदनगर शहरात राष्ट्रवादी पक्ष रिकामा झाल्याचे चित्र आहे. जो बाणेदारपणा आम्ही दाखवला तोच भाजपा स्वत:च्या नगरसेवक किंवा पंचायत समिती सदस्यांबद्दल दाखवणार आहे का? असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे.
निवडणूकपूर्व ‘फॉर्म्युला’
नगरच्या भाजपा-राष्ट्रवादी या युतीची राज्यभर चर्चा झाली. शरद पवार यांच्याच विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने नगरसेवकांची हकालपट्टी करत राष्ट्रवादीने आपली मान सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमदारांना पक्षात ठेवले. हा ‘फॉर्म्युला’ म्हणजे ‘लोकसभापूर्व’ तात्पुरती मलमपट्टी मानली जाते.