Restictions in Maharashtra: आजपासून राज्यात दिवसा जमावबंदी, रात्री संचारबंदी; जाणून घ्या काय सुरु, काय बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2022 06:55 AM2022-01-09T06:55:52+5:302022-01-09T06:58:24+5:30
Maharashtra Lockdown Restrictions Guideline Break the Chain News: मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला असून नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचीही तरतूद करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. रविवारी मध्यरात्री बारा वाजेपासून कठोर निर्बंध लागू करण्यात येत आहेत. रात्री ११ ते सकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार असून दिवसा पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांचा जमाव करण्यास मनाई असेल.
शाळा महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. याशिवाय, मैदाने, उद्याने, पर्यटनस्थळांसह स्विमिंग पूल, जिम, स्पा पुढील निर्देशांपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला असून नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचीही तरतूद करण्यात आली आहे. कोविड नियमांचे भंग केल्यास पन्नास हजारापर्यंत जबर दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी, प्रवासात मास्क वापरणे आणि कोविड प्रतिबंधक व्यवहार बंधनकारक असणार आहे.
कोरोनाचे दूत बनू नका
आपल्याला लॉकडाऊन करून सगळे ठप्प करायचे नाही. रोजी-रोटी बंद करायची नाही, जीवन थांबू द्यायचे नाही पण काही बंधने पाळून या विषाणूपासून राज्य कायमचे मुक्त करायचे आहे. अन्यथा कडक कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व यंत्रणांना, आणि पोलिसांना दिले आहेत. इकडे तिकडे अनावश्यक फिरून कोरोनाचे दूत बनू नका.
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
असे असतील नवे निर्बंध
n सार्वजनिक वावर : पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत पाच किंवा त्याहून अधिक लोकांना बंदी
n अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत फिरण्यास बंदी
n सरकारी कार्यालये : कार्यालय प्रमुखांच्या लेखी परवानगीशिवाय अभ्यागतांना बंदी, ऑनलाईन बैठका, गर्दी टाळण्यासाठी कार्यालयीन वेळांमध्ये बदल.
n राजकीय, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम : कमाल उपस्थिती ५०
n खासगी कार्यालये : लसीकरण पूर्ण झालेल्यांनाच कार्यालयात बोलवावे, ५० टक्के क्षमतेने काम चालविण्याचे आवाहन.
n लग्न सोहळे : कमाल उपस्थिती ५०
n अंत्यसंस्कार : कमाल उपस्थिती २०
n शाळा, महाविद्यालये : १५ फेब्रुवारीपर्यंत बंद. कार्यालयीन कामांना परवानगी
n स्विमिंग पूल, जिम, वेलनेस सेंटर आणि ब्युटी सलून : पूर्णपणे बंद
n केश कर्तनालय : ५०% उपस्थिती. रात्री १० ते सकाळी ७ पर्यंत बंद
शाॅपिंग मॉल, मार्केट
५० टक्के उपस्थिती, लोकांची संख्या दर्शनी भागावर लावणे बंधनकारक. रात्री १० ते सकाळी ८ पर्यंत बंद.
हाॅटेल आणि रेस्टाॅरंट
५० टक्के उपस्थिती, लोकांची संख्या दर्शनी भागावर लावणे बंधनकारक. रात्री १० ते सकाळी ८ पर्यंत बंद.
पर्यटनस्थळे बंद
मनोरंजन पार्क, प्राणिसंग्रहालय, म्युझियम, गडकिल्ले, प्रेक्षणीय तसेच पर्यटन स्थळे - बंद
देशांतर्गत प्रवास : विमान, रेल्वे किंवा रस्ते मार्गे राज्यात येणाऱ्यांचे लसीकरण
पूर्ण झालेले असावे अथवा ७२ तासांपूर्वी आरटीपीसीआरचा निगेटिव्ह अहवाल.
धडकी भरविणारी रूग्णवाढ
n राज्यात शनिवारी १३ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
n दिवसभरात ९,६७१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
n राज्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण ९५.३७% तर मृत्यूदर २.०५% आहे. सध्या १,७३,२३८ सक्रिय रुग्ण आहे.
n २४ तासांत दुसरा डोस घेतलेल्या १५६ पोलिसांसह २३२ पोलिसांना बाधा झाली आहे.