जिभांना लगाम घाला - उद्धव ठाकरेंचा बडोलेंवर निशाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2016 09:00 AM2016-10-18T09:00:11+5:302016-10-18T09:00:11+5:30
पैसेवाल्यांची आंदोलनं यशस्वी होत आहेत अशी टीका करणारे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - 'आज पैसेवाल्यांची आंदोलनं यशस्वी होत आहेत', असं खळबळजनक वक्तव्य करणारे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र सोडले आहे. ' महाराष्ट्राल सध्या खरी गरज आहे ती जिभांना लगाम घालण्याची. कारण त्या जेवढ्या सैल तेवढा सामाजिक सलोखा बिघडण्याचा धोका जास्त असतो' अशा शब्दांत उद्धव यांनी बडोले यांच्यावर निशाणा साधला असून फक्त पैसे खर्च केल्यानेच आक्रोशाला तोंड फुटते हे आम्हाला मान्य नाही असेही त्यांनी 'सामना'च्या अग्रलेखात नमूद केले आहे. तसेच ' महाराष्ट्रात नवी राजकीय घडी बसल्यापासून राज्याची सामाजिक घडी विस्कटली आहे ' अशी टीका त्यांनी राज्य सरकारवर केली आहे.
बडोलेंच्या वक्तव्याचा राज्यभरातील जनता निषेध करत असून बडोले यांना महाराष्ट्रातूनच हाकलून देण्यात यावे अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूरात व्यक्त केली. याच पार्श्वभूमीवर उद्धव यांनी बडोले यांचा समाचार घेत सर्व नेत्यांना जीभेवर ताबा ठेवण्याचा सल्ला दिला आहे. 'मराठा समाजाचे मोर्चे यशस्वी होतात याचे मुख्य कारण पैसा नसून शिस्त, माध्यमांचा नेटका वापर, यंत्रणा राबविणारा हात व मुख्य म्हणजे मनात उसळलेला संताप ' असल्याचेही उद्धव यांनी म्हटले आहे.
अग्रलेखातील महत्वपूर्ण मुद्दे :
>महाराष्ट्रात नवी राजकीय घडी बसल्यापासून राज्याची सामाजिक घडी विस्कटली आहे काय? हा विचार जोर धरत आहे. जनता जोरात रस्त्यावर उतरली आहे व सरकारचे मन अस्थिर आहे. जनता रस्त्यावर उतरली आहे म्हणजे राज्यातील जाती रस्त्यावर उतरून आपापली ताकद दाखवू लागल्या आहेत. ठाणे जिल्ह्यात मराठा समाजाचा मोर्चा यशस्वी झाला. त्याआधी कोल्हापूरचाही झाला. त्याचवेळी नेमक्या विरुद्ध मागण्यांसाठी दलित व इतर बहुजन समाजाचे मोर्चे निघाले, पण मराठा क्रांती समाजाचे मोर्चे विराट होते. यावर महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी असे विधान केले की, ‘‘पैसेवाल्यांची आंदोलने व मोर्चे यशस्वी होत आहेत.’’ बडोले यांनी हे विधान करून मधमाश्यांच्या पोळ्यावर दगड मारला आहे. कारण बडोले यांच्या विरोधात मराठा समाजाचे लोक खवळून उठले आहेत. बडोले यांच्या विधानास रामदास आठवले यांनी पाठिंबा दिला. बडोले यांचे विधान योग्य आहे असे आठवले म्हणतात. बडोले हे भाजपचे तर आठवले हे त्यांचे मित्रपक्ष. याचा अर्थ असा की, मराठा समाजाच्या मोर्चावर लाखोंची उधळपट्टी होत असल्यानेच ते यशस्वी होत आहेत. राजकारणात पैशांचे महत्त्व वाढले आहे व आता फक्त निवडणुकांतच पैसे लागतात असे नाही, तर पक्षांची आंदोलने करायलाही पैसे लागतात. हे सत्य असले तरी फक्त पैसे खर्च केल्यानेच त्यांचे मोर्चे यशस्वी होत आहेत असे सरसकट विधान करणे अन्यायाचे आहे.
>डॉ. आंबेडकर यांच्या जन्मदिनी व महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर लाखो दलित बांधव एकवटतात ते काही पैसे देऊन आणले जात नाहीत. मुंबईतील गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत लाखो लोक एका शिस्तीने पायी चालतात, तेसुद्धा त्यांच्या खिशात कोणी नोटा कोंबतात म्हणून नव्हे. पंढरीच्या वारीतही लाखो वारकरी एका शिस्तीने मार्ग चालीत असतात. ही श्रद्धा असते व तेथे पैशाच्या मोहाने कुणी येत नाही. त्यामुळे पैसेवाल्यांचीच गर्दी होते हे मराठा मोर्चाबाबतचे विधान आम्हाला मान्य नाही. मराठा समाजाचे मोर्चे यशस्वी होतात याचे मुख्य कारण पैसा नसून शिस्त, माध्यमांचा नेटका वापर, यंत्रणा राबविणारा हात व मुख्य म्हणजे मनात उसळलेला संताप आहे.
>‘कोपर्डी’च्या घटनेनंतर हे मन तापले व ते इतके तापले की नेत्यांना त्याचे चटके बसले. एका चिडीतूनच हे मोर्चे यशस्वी होत आहेत. त्यामुळे हे मोर्चे म्हणजे पैशांचा खेळ आहे असे राज्याच्या एका मंत्र्याने सांगणे बरोबर नाही. महाराष्ट्राचे मंत्री बडोले यांनी जे विधान केले त्यामुळे भाजपची पंचाईत झाली. कारण या मोर्चात अनेक ठिकाणी प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यापासून भाजपचे मंत्री, आमदार, खासदार सहभागी झाले व मराठा समाजाच्या मागण्यांना त्यांनी पाठिंबा दिला आहे. आता दानवे वगैरे लोकही पैशाच्या वापरांमुळे मोर्चात सहभागी झाले असे भाजप मंत्र्यांना म्हणायचे आहे काय?
>प्रश्न असा आहे की, बडोले नक्की काय बोलले? त्यांचे म्हणणे असे की, ‘मराठा समाजाचा आपण उल्लेखही केला नाही व देशाच्या एकंदरीत स्थितीवर आपण भाष्य केले.’ बडोले यांचे हे विधान स्वीकारले तरी भाजपचीच पंचाईत होत आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकांत अमित शहा घाम गाळत आहेत व त्यांच्या सभांना गर्दी होत आहे. ही गर्दी म्हणजे पैशाचा वापर करून आणलेले भाडेकरू मानायचे काय? पंतप्रधान मोदी यांच्या सभांनाही गर्दी केली जाते. मग या गर्दीवर कोणते मायाजाल फेकले जाते याचा खुलासा राजकुमार बडोले यांनी केला असता तर बरे झाले असते, पण बडोले बोलले व त्यांना रामदास आठवले यांनी पाठिंबा दिला.
>मुख्यमंत्री नेहमीप्रमाणे गप्प आहेत व हे लक्षण बरे नाही. महाराष्ट्रात जात विरुद्ध जात ही टक्कर फार होऊ नये. कोणीही उठतो व आरक्षण मागतो अशी चिथावणीखोर विधाने करण्यापेक्षा समाजावर आरक्षण मागण्याची वेळ का आली व आरक्षणमुक्त समाजाचे स्वप्न साकार कसे होईल ते पाहायला हवे. वास्तविक, महाराष्ट्राला आता खरी गरज आहे ती जिभांना लगाम घालण्याची. कारण त्या जेवढ्या सैल तेवढा सामाजिक सलोखा बिघडण्याचा धोका जास्त असतो. तेव्हा जिभांना लगाम घाला, विनाकारण वादग्रस्त बोलण्याचे टाळा आणि सलोखा कायम राहील याची काळजी घ्या, असे या मंडळींना सांगण्याची गरज आहे. कारण महाराष्ट्रात सध्या निघणारे मोर्चे हा आक्रोश आहे व फक्त पैसे खर्च केल्यानेच आक्रोशाला तोंड फुटते हे आम्हाला मान्य नाही. यापूर्वी महाराष्ट्रात दलित व इतर समाजाचे प्रचंड मोर्चे निघाले आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे.