निर्बंध सैलावले, दिवाळी धडाक्यात; रेस्टॉरंट आणि दुकानांच्या वेळा वाढवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 07:05 AM2021-10-19T07:05:17+5:302021-10-19T07:07:49+5:30
मुंबईत हॉटेल, रेस्टॉरंट व दुकाने रात्री १२ पर्यंत उघडी ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्याच्या इतर भागांतील वेळा स्थानिक प्रशासनाकडून निश्चित करण्यात येतील.
मुंबई : दिवाळीपूर्वी राज्य सरकारकडून कोरोनाचे एक-एक निर्बंध शिथिल होत असून आता राज्यातील रेस्टॉरंट, दुकाने उघडी ठेवण्यासाठीच्या वेळा वाढवून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत सोमवारी घेण्यात आला. मुंबईत हॉटेल, रेस्टॉरंट व दुकाने रात्री १२ पर्यंत उघडी ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्याच्या इतर भागांतील वेळा स्थानिक प्रशासनाकडून निश्चित करण्यात येतील. दिवाळीपूर्वी बहुतेक सर्व निर्बंध शिथिल करण्यात येतील.
हॉटेल, रेस्टॉरंट, दुकानांच्या वेळा कधीपासून वाढविणार याची तारीख जाहीर झालेली नाही. एक-दोन दिवसांत त्याच्या मार्गदर्शक सूचना जारी होतील. टास्क फोर्सच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, कोरोना आटोक्यात असल्याने निर्बंध आणखी शिथिल करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. मुंबईत ‘टेक होम’साठी हॉटेलांना शेवटची ऑर्डर रात्री १ पर्यंत देता येईल. राज्यात सध्या रात्री १० पर्यंत दुकाने, हॉटेल उघडे ठेवण्याची अनुमती आहे.
ॲम्युझमेंट पार्क शुक्रवारपासून खुले
राज्यातील सर्व ॲम्युझमेंट पार्क शुक्रवार, २२ ऑक्टोबरपासून खुले करण्यात येतील. मात्र, त्यातील वॉटर स्पोर्ट्स बंदच राहतील. पाण्याव्यतिरिक्त असलेल्या राईड्सचा आनंद घेता येणार आहे.
दिवाळीनंतर १५ दिवसांनी पुन्हा आढावा
दिवाळीनंतर १५ दिवसांनी त्यावेळच्या परिस्थितीचा आढावा टास्क फोर्स घेईल आणि निर्बंध नेहमीसाठी हटवायचे का, यावर पुन्हा एकदा विचारविनिमय
करण्यात येईल.
धार्मिक स्थळे आणि आठवी ते बारावीचे वर्ग सुरू
राज्यातील महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरू होणार
चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सभागृहे २२ ऑक्टोबरपासून खुली होणार
धार्मिक स्थळे ६ ऑक्टोबरला खुली करण्यात आली आहेत.
ग्रामीण भागात इयत्ता पाचवी ते बारावी आणि शहरी भागात
आठवी ते बारावीचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरू झाले.
एकपडदा चित्रपटगृहांना सवलती लवकरच
एकपडदा चित्रपटगृहांच्या भवितव्यावरील प्रश्नचिन्ह कायम असतानाच, त्यांना काही सवलती देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
तिसऱ्या लाटेची शक्यता कमीच
दुसऱ्या लाटेनंतर कोरोना उत्परिवर्तित झालेला नसून नवा व्हेरिएंटही आलेला नाही. त्यामुळे कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता कमी आहे, असे जाणकारांचे मत आहे.
२२१ दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या
गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे १३,५९६ नवे रुग्ण आढळले. गेल्या २२१ दिवसांतील हे सर्वात कमी प्रमाण आहे. देशात आता एकूण ३ कोटी ४० लाख कोरोनारुग्ण आहेत.
दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. नियमित मास्क घालणे, सुरक्षित अंतर पाळणे व हात स्वच्छ धुणे खूप आवश्यक आहे. नागरिकांनी बेसावध राहू नये.
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री