‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांवर निर्बंध
By Admin | Published: June 24, 2016 05:11 AM2016-06-24T05:11:10+5:302016-06-24T05:11:10+5:30
फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे (एफटीआयआय) अध्यक्ष गजेंद्र चौहान यांनी, गुरुवारी ‘एफटीआयआय’च्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना तीन वर्षांहून अधिक काळ राहता
नागपूर : फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे (एफटीआयआय) अध्यक्ष गजेंद्र चौहान यांनी, गुरुवारी ‘एफटीआयआय’च्या वसतिगृहात विद्यार्थ्यांना तीन वर्षांहून अधिक काळ राहता येणार नसल्याचे स्पष्ट केले. या संदर्भातील निर्णयावर लवकरच शिक्कामोर्तब होणे अपेक्षित आहे. चौहान यांच्या या वक्तव्यामुळे एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांच्या चिंतेत भर पडण्याची चिन्हे आहेत.
एफटीआयआयमध्ये तीन वर्षांचा ‘सेमिस्टर’ प्रणालीचा अभ्यासक्रम आहे. या तीन वर्षांत विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहण्याची परवानगी आहे. त्यानंतर, विद्यार्थी अभ्यासक्रम पूर्ण करू शकले नाहीत, तर एक वर्ष वाढवून दिले जाईल.
विद्यार्थ्यांकडून आम्ही अभ्यासक्रमाच्या सुरुवातीलाच तीन वर्षांचे शुल्क घेतो. त्यामुळे वाढविलेल्या कालावधीत विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये राहता येणार नाही. याबाबत विद्वत्त परिषदेमध्ये निर्णय झाला आहे. आता प्रशासकीय मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल, असे चौहान यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
गजेंद्र चौहान सकाळी संघ मुख्यालयात दाखल झाले. सुमारे अर्धा तास त्यांनी सरसंघचालकांशी चर्चा केली. एफटीआयआयच्या वादानंतर त्यांनी प्रथमच संघ मुख्यालयाला भेट दिली. याबाबत विचारणा केली असता, सरसंघचालक मला पित्यासारखे आहेत, त्यामुळेच मुलाच्या लग्नाचे पहिले आमंत्रण त्यांना देण्यासाठी आलो असल्याचे चौहान यांनी सांगितले.गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीला एफटीआयआय विद्यार्थ्यांनी विरोध केला होता. ‘संघाशी जवळीक असल्यामुळेच चौहान यांची नियुक्ती झाल्याचे आरोप त्या वेळी झाले होते. याबाबत चौहान यांना विचारणा केली असता, संघाने माझी नियुक्ती केलेली नाही,’ असे म्हणत या मुद्द्यावर बोलण्याचे त्यांनी टाळले.