राज्य सहकारी बँकेवर लावलेले निर्बंध अखेर उठवले
By admin | Published: October 28, 2016 09:20 PM2016-10-28T21:20:41+5:302016-10-28T21:23:21+5:30
अनियमिततेमुळे रिझर्व्हं बँकेने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर लावलेले निर्बंध २० वर्षांनंतर उठविले
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 28 - अनियमिततेमुळे रिझर्व्हं बँकेने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर लावलेले निर्बंध २० वर्षांनंतर उठविले निर्णय उठताच बँकेच्या राज्यात सात शाखा नव्याने स्थापन करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतल्याची माहिती सहकार आणि पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
तत्कालीन संचालक मंडळाच्या मनमानी कारभारामुळे १९९५ साली महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर रिझर्व्हं बँकेने निर्बंध लावले होते. नाबार्डने केलेल्या तपासणीत बँकेच्या कामकाजात अनियमितता असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे रिझर्व्हं बँकेने राज्य बँकेवर विविध प्रकारचे ११ निर्बंध लावले होते. त्यात निगेटिव्ह नेटवर्थ असलेल्या संस्थांना कर्ज पुरवठा न करणे, बँकेच्या अध्यक्षांचे कर्ज उचल मंजुरीचे विशेष अधिकार रद्द करणे, कर्ज समिती सदस्य संख्या १५ पर्यंत सीमित करणे, अपुरा दुरावा करून उचली न देणे, अंतरिम कर्जे न देणे, निगेटिव्ह नेटवर्थ असलेल्या संस्थांना शासकीय थकहमी शिवाय कर्ज पुरवठा न करणे आदींचा समावेश होता़ हे निर्बंध उठविण्यासाठी गेल्या वीस वर्षात राज्य सरकारी बँकेने सातत्याने पाठपुरावा केला होता़ मात्र रिझर्व्हं बँकेच्या अटींची पुर्तता केल्यानंतर राज्य बँकेवरील लावलेले निर्बंध उठविण्याचा निर्णय गुरूवारी घेण्यात आला़
राज्य बँक संचालक मंडळाच्या अनियमित कारभारामुळे तोट्यात होती़ त्यामुळे बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती़ या काळात कारभारात सुसुत्रता आणून बँक तोटयातून नफ्यात आली़ रिझर्व्हं बँकेचे नियम व अटींची पुर्तता झाली़ बुडीत कर्जाचे प्रमाण ३१ टक्केवरून ९ टक्केवर आले़ ठेवीमध्ये मोठया प्रमाणात वाढ झाली़ या कालावधीत ठेवीदारांच्या मनात विश्वास निर्माण करण्यात राज्य बँक यशस्वी ठरली़ या पार्श्वभूमीवर रिझर्व्हं बँकेच्या निर्देशाचे पालन झाल्याने निर्र्बंध उठविण्याचा निर्णय घेण्यात आला़
-------------------
सात नवीन शाखा
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या राज्यात सात नवीन शाखा स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे़ अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकांना या नव्या शाखा पर्याय ठरू शकतात़ राज्यात पुणे, नाशिक, नांदेड, कोल्हापूर, सोलापूर, धुळे आणि बीड याठिकाणी शाखा सुरू करण्यास रिझर्व्हं बँकेने राज्य बँकेला परवानगी दिल्याची माहितीही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली़
--------------------
कर्ज वाटप शक्य
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून शेतकऱ्यांना पीककर्ज, मध्यम मुदतीचे कर्ज दिले जाते़ अलीकडच्या काळात या बँकांनी साखर कारखानदारीला कर्जपुरवठा मोठया प्रमाणात केला आहे़ विशेषत: संचालक मंडळात असलेल्या मंडळींच्या खासगी साखर कारखान्यांना केलेल्या कर्जाची परतफेड होवू शकली नाही़ त्यामुळे रकमा कारखानदारीत अडकल्या आणि शेतकऱ्यांना गरजेनुसार कर्जपुरवठा करण्यात अडथळे निर्माण झाले़ त्यामुळे राज्य बँक यापुढील काळात जिल्हा मध्यवर्ती बँकेला पर्याय ठरू शकते़ विशेषत: अडचणीत असलेल्या जिल्हा बँकांच्या ठिकाणाची निवड नव्याने शाखा काढताना करण्यात आली आहे़
---------------------
सहकारमंत्र्यांची सकारात्मकता
सहकारमंत्री सुभाष देशमुख सहकार खात्यात दुरूस्ती करण्याच्या प्रयत्नात आहेत़ विशेषत: जिल्हा सोसायट्या, जिल्हा मध्यवर्ती बँकामध्ये सुधारणा घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे़ तरीही सरकार सहकार खाते मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत असल्याची टिका विरोधकांकडून सातत्याने होत आहे़ या पार्श्वभूमीवर राज्य सहकारी बँकेवरील उठविलेले निर्बंध आणि या बँकेच्या राज्यात सात शाखा स्थापन करण्याचा त्यांचा निर्णय सकारात्मक दिशेने वाटचाल करणारा आहे असे स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया सहकार क्षेत्रात उमटत आहेत़
-----------------
जिल्हा बँका अडचणीत असल्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज देवू शकत नाहीत़ त्यामुळे सोसायट्यांना राज्य बँकेकडून कर्ज देण्याची माझी कल्पना होती़ राज्य बँकेची पहिली शाखा लवकरच सोलापूरात उघडली जाईल़ जागेचा शोध सुरू आहे़ सोईची जागा मिळताच बँक सुरू केली जाईल़ कर्ज वाटपात स्पर्धा निर्माण झाली पाहिजे़ त्यातून माझ्या गरीब शेतकऱ्यांना सुलभ, कमी व्याजदराने कर्जपुरवठा होईल़ सहकार क्षेत्रात असलेली मक्तेदारी शेतकऱ्यांना अडचणीची ठरत होती़ आता शेतकऱ्यांसाठी नक्कीच अच्छे दिन येतील़
-सुभाष देशमुख
सहकार व पणन मंत्री, महाराष्ट्र राज्य