निर्बंधांचे थर गडगडले, 'निषेधा'ची हंडी फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2016 07:50 PM2016-08-25T19:50:11+5:302016-08-25T19:50:11+5:30
गोविंदा पथकांनी काळ्या फिती बांधून, काहींनी शिडीवर चढून हंडी फोडून तर काहींनी जमिनीवर झोपून हंडी फोडत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध केला.
स्नेहा मोरे
मुंबई, दि. 25 - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्बंधानंतर निर्णयाच्या तडजोडीसाठी धावपळ करणाऱ्या गोविंदा पथकांनी अखेर गुरुवारी नियम पायदळी तुडविले. सकाळपासून गोविंदांनी जागेवाल्यांच्या हंड्या फोडून इतर हंड्या फोडण्यास मार्गक्रमण केले. काही गोविंदा पथकांनी काळ्या फिती बांधून, काहींनी शिडीवर चढून हंडी फोडून तर काहींनी जमिनीवर झोपून हंडी फोडत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध केला. गोविंदा पथकांनी पत्करलेला या ह्यनिषेधास्त्रह्ण पद्धतीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले.
गेल्या २ वर्षांपासून दहीहंडी उत्सवावरील वादाचे सावट यंदा अधिकच दाट झाले होते. १८ वर्षांखालील गोविंदांच्या सहभागावर सर्वोच्च न्यायालयाने घातलेली बंदी आणि २० फूट थरांच्या उंचीच्या मर्यादेने गोविंदा पथकांमध्ये कमालीचे नाराजीचे वातावरण पसरले होते. याच नाराजीचा उद्रेक गोपाळकालाच्या दिवशी दिसून आला. सर्वोच्च न्यायालयाचे नियम अक्षरश: पायदळी तुडवत गोविंदा पथकांनी ह्यथरथराटह्ण कायम राखला. गोपाळकालाच्या दिवशी पावसानेही दडी मारल्याने यंदा हा उत्सव कोरडाच साजरा झाल्याचे दिसून आले.
यंदाच्या वर्षी शहर-उपनगरात तुलनेने मोठ्या आयोजकांच्या हंड्या कमी असल्याने गोविंदा पथकांनी मुंबईच्या गल्लोगल्ल्यांत जाऊन हंड्या फोडल्या. दादरमध्ये जय हनुमान या जुन्या दहीहंडी पथकाने न्यायालयाच्या निर्णयाविरोधात जमिनीवर झोपून नऊ थर रचले. विवेकानंद यूथ कनेक्ट या गोविंदा पथकाने बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्यासमोरल चार थरांची सलामी देत उपस्थितांची मने जिंकली. दादर येथे महिला मंडळाच्या गोविंदांची आगळी वेगळी चक्रीहंडी बघायला मिळाली. दहीहंडी फोडण्यासाठी चार फिरत्या थरांची थरारक कसरत यावेळी सादर करण्यात आली. विशेष म्हणजे सर्वांत वरच्या थरावर जाणाऱ्या चिमुकल्या बालगोविंदाला पूर्णपणे सुरक्षित असा संरक्षण सूट घालण्यात आला होता. बालगोविंदाचा थर पूर्ण झाल्यानंतर चौफेर फिरत चक्री दहीहंडी साकारण्यात आली. यावेळी उपस्थितांना या बालगोविंदाने सलाम केला, त्यानंतर दहीहंडी फोडली.
एल्फिस्टन येथे मनसेच्या मुनाफ ठाकूर आयोजित दहीहंडी उत्सवात न्यायालयाच्या निषेधार्थ आयोजकांनीच शिडीवर चढून हंडी फोडली. चेंबूरमध्ये दहीहंडी उत्सवात जपानी परदेशी नागरिकांनी सहभाग घेत या उत्सवाचा आनंद लुटला. शिवाय, या चमूमधील काही महिलांनी यावेळी गोविंदा पथकांतील तरुणांना राख्या बांधून रक्षाबंधनही साजरे केले. बोरीवली येथे प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी आयोजनात नियम मोडल्याचे दिसून आले. चेंबूरमध्ये मनसेचे पदाधिकारी कर्ण दुनबळे यांच्या दहीहंडी उत्सवात गोविंदा पथकाने आठ थर रचून नियमांचे उल्लंघन केले. जोगेश्वरी परिसरात साईराम गोविंदा पथकाने डोळ्यावर काळी पट्टी बांधून चार थरांची सलामी दिली. तर गोरेगावच्या गावदेवी महिला गोविंदा पथकाचीही पाच थरांची हंडी फोडत उंची आणि १८ वर्षांखालील गोविंदाच्या सहभागाचे नियम धाब्यावर बसविले.