ग्राम पाणीपुरवठा समित्यांची पुनर्रचना करणार
By admin | Published: June 10, 2014 10:40 PM2014-06-10T22:40:51+5:302014-06-10T23:47:36+5:30
ग्रामीण पाणी पुरवठा समित्यांची पुनर्रचना करून या समित्यांमध्ये सरपंच आणि ग्रामसेवकाचा समावेश केला जाईल.
ग्राम पाणीपुरवठा समित्यांची पुनर्रचना करणार
मुंबई - ग्रामीण पाणी पुरवठा समित्यांची पुनर्रचना करून या समित्यांमध्ये सरपंच आणि ग्रामसेवकाचा समावेश केला जाईल. तसेच जिल्हा परिषदेच्या उपअभियंत्यांकडून कामाची तपासणी करण्यात येईल, अशी घोषणा पाणी पुरवठा मंत्री दिलीप सोपल यांनी आज विधानसभेत केली.
ग्राम पाणी पुरवठ्या समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्यामुळे पाणी पुरवठा योजना रखडल्या आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया जात आहेत, असे मत विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्यासह दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी आज व्यक्त केले.
बोरोळ, ता.देवणी येथील पाणीपुरवठा योजनेबाबतचा मूळ प्रश्न ज्येष्ठ सदस्य डॉ.शिवाजीराव पाटील यांनी विचारला होता. या गावात विहिरीसाठी १५ मीटर खोदकाम होऊनही पाणी न लागल्याने दुसरा उद्भव घ्यावा लागला, त्यासाठी ६१ लाख रुपये खर्च झाले, असे सोपल यांनी सांगितले. पाणी पुरवठा योजना रखडण्याचे कारण म्हणजे ग्राम पाणीपुरठा समित्यांवर जबाबदारी निित नाही. त्यामुळेच गैरव्यवहार वाढत असल्याचे सर्वपक्षीय आमदारांनी सांगितले. अध्यक्षांनीही नाराजी व्यक्त केली. ग्राम पाणीपुरवठा समित्यांमध्ये तज्ज्ञ नसतात. त्यामुळे मनमानी निर्णय होतात, अशी भावनाही व्यक्त झाली. तेव्हा या समित्यांची पुनर्रचना केली जाईल, असे सोपल म्हणाले. जलस्त्रोताचे काम झाल्याखेरीज इतर खर्च करु नये असा स्पष्ट सूचना देण्यात येईल, असेही मंत्री सोपल यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)