महाराष्ट्रात बीआरएसची अनपेक्षित मुसंडी; तीन जिल्ह्यांत १६ ग्राम पंचायतींवर वर्चस्व
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2023 03:43 PM2023-11-06T15:43:19+5:302023-11-06T15:44:36+5:30
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्य़ा ग्रामीण भागात जमीन तयार करणाऱ्या भारत राष्ट्र समितीने यावेळच्या ग्राम पंचायत निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्राच्य़ा ग्रामीण भागात जमीन तयार करणाऱ्या भारत राष्ट्र समितीने यावेळच्या ग्राम पंचायत निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. यामध्ये भंडारा, सोलापूर आणि बीड या जिल्ह्यांचा समावेश आहे.
भंडारा जिल्ह्यात ६४ ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले होते. या ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध बीआरएस असाच सामना रंगला होता. यापैकी ९ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविण्यास बीआरएसला यश आले आहे. तर सोलापूरमध्ये सहा ग्रामपंचायतींवर तेलंगानाच्या या सत्ताधारी पक्षाने सत्ता मिळविली आहे.
राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. याचे आज निकाल हाती येत आहेत. यापैकी १९६९ जागांवर निकाल जाहीर झाले आहेत. ११८९ जागांवर महायुती, तर ४४५ जागांवर मविआ आणि ३३५ जागांवर इतर पक्षांना यश मिळाले आहे.
बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील एक पोटनिवडणुकीसह 33 ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाले आहेत. सकाळपासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली होती. गेवराईमध्ये सर्वात जास्त ग्रामपंचायत राष्ट्रवादी (अजित पवार)गट विजयी झाले आहेत. त्यानंतर इतर ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे(ठाकरे गट)वर्चस्व दिसून आले. दरम्यान, गेवराईमध्ये भारत राष्ट्र समितीने देखील खाते खोलले आहे. रेवती देवकी ही ग्राम पंचायत बीआरएसकडे गेली आहे.