26 जून आधी जाहीर होणार नीट परीक्षेचा निकाल
By Admin | Published: June 12, 2017 12:04 PM2017-06-12T12:04:38+5:302017-06-12T12:11:16+5:30
नीट 2017 परीक्षेसंबंधातील कुठल्याची याचिकेवर सुनावणी करु नका असे निर्देशच सर्वोच्च न्यायालयाने अन्य न्यायालयांना दिले.महाराष्ट्रातून सुमारे पावणेतीन लाख विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली होती.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 - MBBS आणि BDS या वैद्यकीय अभ्याक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट प्रवेश परीक्षेचा निकाल 26 जून आधी जाहीर करण्याचे आदेश सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिले. निकालाला स्थगिती देण्याचा मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश रद्द केला. नीट परीक्षा घेणा-या सीबीएसई बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 26 जूनपर्यंत निकाल जाहीर करणार असल्याचे सांगितले.
आधी 8 जूनला हा निकाल जाहीर होणार होता. नीट 2017 परीक्षेसंबंधातील कुठल्याची याचिकेवर सुनावणी करु नका असे निर्देशच सर्वोच्च न्यायालयाने अन्य न्यायालयांना दिले.महाराष्ट्रातून सुमारे पावणेतीन लाख विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली होती. देशभरातील जवळपास साडेअकरा लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
महाराष्ट्र सरकारने केवळ एमबीबीएस नव्हे, तर सर्वच वैद्यकीय प्रवेशांसाठी ‘नीट’चा गुणवत्ताक्रम लागू केला आहे. दरम्यान, सदरील परीक्षेचा निकाल ८ जून रोजी अपेक्षित असताना मद्रास उच्च न्यायालयाने निकालालाच स्थगिती दिली. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला होता. नीट परीक्षा इंग्रजीबरोबरच विविध दहा प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात आली. त्यात प्रादेशिक भाषांतील परीक्षेची काठिण्यपातळी इंग्रजीच्या तुलनेने कमी असल्याचा दावा करीत एका विद्यार्थ्याने मद्रास उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
त्याअनुषंगाने न्यायालयाने सीबीएसई, एमसीआय तसेच शासनाला नोटीस बजावली. ७ जूनपर्यंत ‘नीट’चा निकाल जाहीर करण्यास स्थगिती दिली होती.‘नीट’ची काठिण्यपातळी सर्वच भाषांमध्ये सारखी असायला हवी होती. प्रत्यक्षात इंग्रजीमधून परीक्षा देणाऱ्यांना अधिक कठीण राहिली, हा दावा खोडून टाकावा लागेल.
अथवा देशपातळीवर गुणवत्ता यादी जाहीर करताना गुणांचे समानीकरण करण्याची एखादी पद्धत न्यायालयासमोर ठेवावी लागणार आहे. ज्यामुळे परीक्षेच्या काठिण्यपातळीत बदल असले तरी गुणवत्ताक्रम ठरविताना कुठल्याही विद्यार्थ्यावर अन्याय होणार नाही, अशा पद्धतीचे सूत्र मांडावे लागणार आहे. त्यामध्ये पर्सेन्टेजऐवजी पर्सेंन्टाईल ही एक पद्धत सांगितली जाते.
कुठल्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेणे हे लाखो विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे. ज्यांनी अभ्यास करून परीक्षा दिली आहे, त्यांच्यावरील दडपण वाढविणारे आहे. सातत्याने दोन वर्षांचा ताण, अभ्यासाचे कठीण वर्ष पूर्ण करून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे गेलेल्या विद्यार्थ्यांना आता निकालाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे ‘नीट’ पुन्हा परीक्षा घेणे अव्यवहार्य असल्याचे अभ्यासक, तज्ञांचे मत होते.
The Supreme Court has asked CBSE to declare #NEET results before 26 June
— ANI (@ANI_news) June 12, 2017